चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी पश्चिम दिशेकडील मुंबईकडे न बघता, पूर्वेकडील गडचिरोलीतील आदिवासींच्या अंधारमय जीवनाकडे बघावे गुणवंतांनी अर्थप्राप्तीसाठी न जगता मागासलेल्या समाजाच्या कल्याणासाठी अर्थपूर्ण जगावे, असा मौलिक संदेश ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी दिला. गोंडवाना विद्यापीठाच्या द्वितीय दीक्षांत समारंभात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित होते. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्यासह वेगवेगळ्या शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. पूर्वी विशिष्ट समाजातील विद्यार्थी सुवर्ण पदक मिळवित होते. मात्र आता सर्व समाजातले घटक शिक्षणात सुवर्ण पदक मिळवित आहेत. उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत मुली पुढे आल्या आहेत. यावरून समाज सुधारक महात्मा फुले व महर्षी कर्वे यांच्या स्वप्नातील शैक्षणिक क्रांती गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात घडत असल्याचे स्पष्ट होते, असेही डॉ. बंग म्हणाले. या समारंभात मुस्लिम समाजाच्या एका गुणवंत मुलीने सुवर्ण पदक स्वीकारतांना माझ्याशी हस्तांदोलन केले तसेच वाकून नमस्कारही केला. यावरून आपल्या देशाला आता तालिबानचा धोका नाही. गोंडवाना विद्यापीठामार्फत गावागावात शैक्षणिक क्रांती पोहोचत आहे, असेही डॉ. बंग यांनी सांगितले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर व प्रा. अस्लम शेख यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)या प्रज्ञावंतांना पदवीदानसंतोष हेडाऊ, स्नेहा येंलगवार, कश्यप ललीतकुमारी सुरेश, देबनाथ सुशील, अल्का लांडगे, माधुरी बोरीकर, रिमा देहलानी, मोनिका सावलानी, भाविका बलदानिया, अनिल केला, अस्मिता रायपुरे, शुभांगी नक्षीणे, शिवशंकर रामटेके, भूमी पटेल, विक्की राठोड, गोविंदा झाडे, नम्रता कावळे, शब्बीर हुसेन, शागुप्ता हलीम, गणेश कुळमेथे, श्वेता रत्नपारखी, एकता गायकवाड, मीनल घिवे, उमेश वरघणे, महेश मेश्राम, भाग्यश्री मदनकर, स्वाती टेकडे, मोनाली नागपुरे, सरिता मंडरे, शुभांगी तिघरे, साईनाथ सोनटक्के, मार्शलीन खोब्रागडे, अरविंद सिडाम, सदानंद धुळसे, नरेंद्र मेश्राम या सुवर्ण पदक प्राप्त प्रज्ञावंतांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
अर्थप्राप्तीसाठी नव्हे तर अर्थपूर्ण जगा- अभय बंग
By admin | Published: January 23, 2015 12:32 AM