पाणी गुणवत्ता कार्यशाळा : जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देशचंद्रपूर : शुद्ध पाणी पिणे हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याच्या असलेल्या स्त्रोतांवर गावातील नागरिक भांडी धुणे किंवा जनावरांना पाणी पाजणे किंवा कपडे धुणे अशी कामे करत असतील तर ते पाणी अशुद्ध होत. ते पाणी पिण्यास योग्य राहत नाही. त्यामुळे अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले यांनी दिले. जिल्हा परिषदेमधील कन्नमवार सभागृहात आयोजित पाणी गुणवत्ता कार्यशाळेत त्या बोलत होत्या.कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंह, महिला व बाल कल्याण सभापती सरिता कुडे, अर्थ व आरोग्य समिती ईश्वर मेश्राम, आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुधीर मेश्राम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत राजेश राठोड, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग मिलिंद चंद्रागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत वृक्ष व पुस्तक भेट देऊन करण्यात आले.संध्या गुरुनुले पुढे म्हणाल्या, पाणी शुद्ध ठेवणे ही एकट्या आरोग्य विभागाची जबाबदारी नाही तर ती प्रत्येक कर्मचारी तसेच प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. शाळांमधील असलेल्या लहान मुलांना शुद्ध पाणी कसे मिळेल, याकडे जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षक, मुख्याध्यापक यांनी प्रयत्न करावे. लहान मुलांची प्रकृती सुदृढ नसेल तर घरच्यांना आर्थिक हानी पोहोचेल आणि ही बालके देशाचा विकास करू शकणार नाहीत. कारण त्यांची प्रकृतीच चांगली नसेल. त्यामुळे लहान मुलांना निर्जंतुक पाणी मिळाले पाहिजे यावर भर द्यावा, असे त्या म्हणाल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र सिंह म्हणाले, तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता आज आपण शासन निर्णय म्हणून वापरतो. त्यांनी त्याच काळात भविष्यवाणी करून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले होते. ते आज आपल्या कामी पडत आहेत. गावातील पाणी शुद्ध ठेवणे ही एकट्याची कुणाची जबाबदारी नसून ती सर्व विभागांनी एकत्रित काम करावे. म्हणजे आपले गाव स्वच्छ राहील. पाणी गुणवत्ता कार्यशाळा आयोजित करण्यामागील हेतू नागरिकांना पाण्याचे महत्त्व, पाणी बचतीचे महत्त्व, शुद्ध पाण्यासाठी जनजागृती होणे हा आहे व याची प्रचार प्रसिद्धी आपण गावागावात जावून करावी असे ते म्हणाले.कार्यशाळेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी पाणी गुणवत्ता स्वच्छता व आरोग्य यांचा संबंध, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी सुधीर मेश्राम यांनी स्वच्छता सर्वेक्षणात आढळून आलेल्या त्रुटींमुळे ग्रामपंचायतींना वितरित केलेले लाल व पिवळे कार्ड, साथीच्या कालावधीत करावयाच्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. ब्लिचींग पावडरचे महत्त्व, साठवण, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ टेंभुर्णीकर यांनी ओटी टेस्ट करणे, फिल्ड टेस्ट कीट कशी वापरावी, याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पाणी गुणवत्ता सल्लागार अंजली डाहुले यांनी जिल्हा पाणी सुरक्षा कृती आराखडा यावर सादरीकरण करून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन समाज शास्त्रज्ञ प्रकाश उमके यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बोदेले यांनी केले. कार्यशाळेला गट विकास अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता, विस्तार अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
शुध्द पाणी अशुध्द करणाऱ्यांवर आता होणार कारवाई !
By admin | Published: June 12, 2016 12:43 AM