चंद्रपूर : आता प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागातही हे बोधचिन्ह झळकणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम शौर्य आणि अतुलनीय कार्याच्या गौरवार्थ आणि स्मरणार्थ राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेचे आणखी एक उदाहरण आता महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक कार्य विभाग अनेक वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. त्यात आता शिवरायांचे शौर्य व पराक्रम अधोरेखित करणारे बोधचिन्ह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या अतिशय कल्पक अशा प्रयत्नांना यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा मनामनांत व्हावा, जगभरातील प्रत्येक मराठी माणसापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती आणि पराक्रम पोहोचावा, या उद्देशातून हा निर्णय घेण्यात आल्याचे २४ जुलैच्या शासन निर्णयात नमूद केले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयाला दर्शनी भागात बोधचिन्ह लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेचे कायमच कौतुक होत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त त्यांनी आयोजित केलेला प्रत्येक उपक्रम अनोखा ठरला. गेट वे ऑफ इंडियाला शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन असो वा रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा असो. प्रत्येक आयोजनातून सांस्कृतिक कार्य विभागाने आपले वेगळेपण सिद्ध केले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी चंद्रपुरातील सागवान काष्ठ रवाना करण्याचा सोहळा तर अख्ख्या देशाने अनुभवला. तर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये एकमेकांना भेटल्यानंतर वा दूरध्वनीवरील संभाषण सुरू करताना हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणण्याचा सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय पाळला जात आहे. आता शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या बोधचिन्हाच्या बाबतीत झालेला निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आणखी एक अनोखा उपक्रममहाराजांच्या काळांतील नाणी, गडकिल्ले, अष्टप्रधान मंडळ आदी प्रत्येक गोष्ट प्रेरणादायी आहेत. या प्रेरक गोष्टी सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह सर्वदूर पोहोचविण्याच्या निर्णयाची भर पडली आहे.
शिवरायांचा पराक्रम शौर्य अधोरेखित करणारा निर्णयना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य विभागाची धुरा सांभाळल्यापासून विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रत्येक निर्णयाला कल्पकतेची व संस्कृती रक्षणाची किनार असते. त्यामुळे कुठलाही निर्णय सर्वांचे लक्ष वेधून घेतो आणि कौतुकासही पात्र ठरतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम आणि शौर्य अधोरेखित करणारा निर्णय म्हणून संपूर्ण महाराष्ट्र या निर्णयाकडे कौतुकाने बघत आहे.