लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कामगारांच्या जीवाला धोका होवू नये, यासाठी मनपा, नगरपरिषद व ग्रामपंचायत क्षेत्रात मल:निस्सारण कुंड, खड्डे आणि भूमिगत गटारातील बंदिस्त जागेत स्वच्छतेची कामे करताना १. ७५ मीटरपेक्षा अधिक अंतरावर कामगारांचा वापर करण्यास शासनाने बंदी घातली आहे. विशेष म्हणजे सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मल:निस्सारणाची कामे करण्यासाठी कामगारांना अतिखोल खड्डयात उतरविण्यास कंत्राटदारांनी दबाव टाकला होता. त्यामुळे कामगारांना विविध आजारांना बळी पडण्याची वेळ आली. याविरुद्ध स्वच्छता कामगार संघटनांनी राज्यभरात आंदोलन करून समस्येकडे लक्ष वेधले होते. परिणामी, महानगर पालिका, नगरपरिषद व ग्रामपंचायत हद्दीमध्ये कुंड, खड्डे आणि भूमिगत गटारांची स्वच्छता शक्यतो यंत्राद्वारे करण्याचे राज्य शासनाने मान्य केले. मात्र, यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर न केल्याने कामगार संघटनांनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले. त्यामुळे शासनाने या धोरणात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला.नव्या नियमानुसार १.७५ मीटर खोलीपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या गटारातील घाण उपसण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यास बंदी घातली आहे. ही कामे करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यापूर्वी बंदिस्त जागेची खोली, रुंदी तसेच तेथील घटकांची मोजणी करण्यात यावी. बंदिस्त जागेतील हवेत विषारी वायू, ज्वलनशील वायू व प्राणवायूची कमतरता नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे. ही तपासणी यंत्राद्वारेच करावी. बंदिस्त जागेतील कामे करताना पुरेशी ताजी हवा उपलब्ध होण्यासाठी यांत्रिक वायू विसर्जनाची आवश्यकतेनुसार व्यवस्था करावी, असेही आदेशात नमूद केले आहे.ग्रामपंचायतींना घ्यावे लागेल प्रशिक्षणग्रामपंचायत व नगरपरिषद हद्दीतील गटारे स्वच्छ करतानाही राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. बंदिस्त जागेतील सुरक्षेची सर्व खबरदारी घेतल्यावरच संबंधित मजूरांना बंदिस्त जागेत उतरण्यास परवानगी द्यावी. कामाच्या वेळी बंदिस्त जागेच्या बाहेर लगतच्या जमिनीवर एक कर्मचारी हजर ठेवावा. सर्व मजूर बंदिस्त जागेतून सुखरूप बाहेर येईपर्यंत अथवा दुसरा कर्मचारी येईपर्यंत जागा सोडता येणार नाही. सुरक्षा पट्टा घातल्यानंतरच बंदिस्त जागेत उतरावे. ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मदतनीस आणि इच्छुक नागरिकांना ग्रामपंचायतीने स्वखर्चातून प्रशिक्षण देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
आता भूमीगत गटारात १.७५ मीटरहून अधिक खोल जाता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:59 AM
भूमिगत गटारातील बंदिस्त जागेत स्वच्छतेची कामे करताना १. ७५ मीटरपेक्षा अधिक अंतरावर कामगारांचा वापर करण्यास शासनाने बंदी घातली आहे.
ठळक मुद्देकामगार संघटनांना दिलासास्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाईचा बडगा