राजेश खेडेकर
बामणी (बल्लारपूर) : शेतातील झाडांवर औषधी फवारणीची गरज असतेच असे नाही. मात्र, फवारणी केली पाहिजे या मानसिकतेतून कास्तकार गरज नसतानाही फवारणी करीत असतात. यात श्रम, वेळ तसेच पैसा विनाकारण वाया जातो. तसे होऊ नये याकरिता कृषी विभागाने फवारणीची नेमकी गरज आहे काय, याचा शोध पिकाच्या परिसरात कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप) लावून सुरू केला आहे. बल्लारपूर तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वांवर एकूण ४८ सापळे लावले आहेत.
किडे वा अळी पिकावर आक्रमण करून उभ्या पिकांची नासधूस करतात. अळी वा किड्यांची उत्पत्ती पाखरू ज्याला कृषी भाषेत पतंग असे म्हटले जाते. ही पतंग शेतात किती प्रमाणात आहेत, याचा शोध कामगंध सापळ्याद्वारे घेतला जातो. पिकाच्या मधोमध हे सापळे उभे केल्यानंतर तीन दिवसांत आठ पतंग त्यात अडकले तर फवारणीची गरज आहे, अन्यथा नाही, असे ठरविले जाऊन कासत्काराना तसे मार्गदर्शन कृषी विभाग करते. सापळ्यात अडकलेल्या पतंगांना नंतर नष्ट करणे गरजेचे आहे. पतंगाची अळी निर्मितीची क्षमता खूप मोठी (एकाच वेळेला ८० ते १०० अंडी) आहे. म्हणून पुढील अनर्थ टाळण्याकरिता कामगंध सापळ्याद्वारे त्यांचा शोध घेऊन त्याचप्रमाणे शेतात निंबोडी द्रव्यांची फवारणी करणे योग्य ठरते. बल्लारपूर तालुक्यात कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात मंडळ कृषी अधिकारी बलदेव सलामे व त्यांचे सहकारी कामगंध सापळ्यांच्या मोहिमेत लागले आहेत.
बॉक्स
असे अडकतात पतंग
पतंग खूप लहान व करड्या रंगाचे असतात. कामगंध सापळ्यात विशिष्ट गंधाची गोळी ठेवली जाते. त्याच गंधाच्या प्रभावाने पतंग सापळ्यात येतात. त्यांना त्यातून जाता येत नाही, अशी व्यवस्था सापळ्यात आहे.