चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह आता ग्रामीण खेड्यापाड्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत काही तालुक्यात कोविड केअर सेंटर आहेत. मात्र सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्यांना या ठिकाणी उपचारार्थ दाखल केले जात आहे. ऑक्सिजनचा अभाव असल्याने गंभीर रुग्ण चंद्रपूरला रेफर केले जात असल्याने चंद्रपूरवरील भार वाढत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील तालुकास्थळी ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू झाल्या आहेत.
बॉक्स
कोरपनात झाली बैठक
कोरपना तालुक्यात एकही ऑक्सिजन प्लांट नाही. या संदर्भात आमदार सुभाष धोटे यांनी अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व दालमिया या चारही सिमेंट कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजुरा येथे बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. मात्र अजूनपर्यंत कार्याला सुरुवात झालेली नाही. तसेच तालुक्यात ऑक्सिजनचा फार मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. रुग्णांना लगेच चंद्रपूर येथे स्थानांतरित करावे लागतात. मात्र चंद्रपुरातही बेड उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला.
बॉक्स
नागभीडमध्ये चंद्रपुरातून येते ऑक्सिजन
सध्या नागभीडमध्ये ऑक्सिजन प्लांट नाही. नागभीड येथे चंद्रपूर येथून ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यासाठी चंद्रपूरला रोज गाडी पाठवावी लागते. सध्या येथील कोविड सेंटरवर जवळजवळ ५० ऑक्सिजन सिलिंडर्स असले तरी यातील २० ते २५ सिलिंडर्स भरून आणण्यासाठी रोज चंद्रपूरला पाठवावे लागतात.
बॉक्स
ब्रह्मपुरीत ऑक्सिजन प्लांटसाठी जागेचा शोध
सध्या ब्रम्हपुरीतील संपूर्ण कोविड सेंटरला ऑक्सिजन पुरवठा नियमितपणे सुरू आहे. ऑक्सिजन प्लांट संदर्भात जागा निश्चित करणे सुरू आहे. परंतु जागा अजूनही निश्चित न झाल्याने ऑक्सिजन प्लांटला सुरुवात झाली नाही. प्राप्त माहितीनुसार ऑक्सिजन प्लांट ग्रामीण रुग्णालय परिसरातच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बॉक्स
बल्लारपुरात प्लांट नाही
बल्लारपूर तालुक्यात ऑक्सिजन प्लांटची अजूनतरी व्यवस्था झाली नाही. परंतु गरजूंना शासकीय रुग्णालयातून ऑक्सिजन पुरविण्याची व्यवस्था आहे व काही समाजसेवी संस्थानी ऑक्सिजन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे.
बॉक्स
भद्रावतीत ऑक्सिजन प्लांटसाठी टेंडर निघाले
भद्रावती : नगर परिषद भद्रावतीकडून ऑक्सिजन प्लांटसाठी टेंडर काढण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय भद्रावतीच्या जागेवर हा प्लांट उभारण्यात येणार आहे. मोठे ८८ सिलिंडर एका दिवशी अशा क्षमतेचा हा ऑक्सिजन प्लांट राहणार आहे. येत्या १५ जूनपर्यंत सदर प्लांट सुरू होणार आहे.
बॉक्स
चिमुरात चंद्रपुरातून येतो ऑक्सिजन
चिमूर तालुक्यात आजघडीला कुठेही ऑक्सिजन प्लांट नाही. मात्र चिमूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना गरज असल्यास ऑक्सिजन लावला जातो. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात रोज २५ ते ३० ऑक्सिजन सिलेंडर चंद्रपूरवरून भरून आणले जातात.
बॉक्स
जिवतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
सध्यातरी जिवती येथे ऑक्सिजन प्लांट नाही. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी जिवती येथे मिनी ऑक्सिजन प्लांट उभारून तातडीने ऑक्सिजन बेड सुरू करावे, अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
बॉक्स
मूलमध्ये एक कोटीची तरतूद
मूल तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक पातळीवरच बाधितांवर तत्काळ उपचार व योग्य सुविधा देता यावी म्हणून येत्या काळात उपजिल्हा रुग्णालय येथे एक कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प निर्माण करून ऑक्सिजन पाईप लाईनने जोडलेल्या ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेटी दरम्यान दिली. तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
बॉक्स
राजुरात ऑक्सिजन प्लांटसाठी मागितली परवानगी
राजुरा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची सोय असून राजुरा येथे नगर परिषद अध्यक्ष अरुण धोटे यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी मागितली आहे. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी दोन कोटी रुपयांची तरतूद रुग्णालयात उपचार करण्यासाठी आवश्यक सामग्री खरेदीसाठी केली आहे.
बॉक्स
वरोरात प्लांटसाठी जागेची पाहणी
वरोरा उपजिल्हा रुग्णालयाला दररोज ५० ते ५५ ऑक्सिजन सिलिंडर लागतात. ऑक्सिजन सिलिंडर चंद्रपूर येथून भरून आणावे लागते. ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी ट्रामा केअर युनिट व उपजिल्हा रुग्णालयातील परिसरातील पाहणी करण्यात आली आहे.