लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देश-विदेशातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर -हुडकेश्वर -चारगाव-ठाणा-सावंगी -गिरड- मांगरुळ-केसलाबोडी-खडसंगी -नवेगाव गेट (ताडोबा) या ८७ किमी मार्गाला मंजुरी मिळाली आहे. सोबतच या मार्गाला विकसित करून राज्य मार्गाचा दर्जा दिला जाणार आहे. या मार्गामुळे नागपूर येथून ताडोबा अवघ्या ८७ किमी अंतरावर येणार आहे.चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया हे या मार्गाला मंजुरी मिळावी, यासाठी मागील तीन वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.हा मार्ग नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातून जात असून यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला आवागमनासाठी सोयीचा ठरणार आहे. खडसंगी परिसरातील जनतेला नागपूर हे अंतर केवळ ८० किलोमीटर एवढेच पडणार आहे. या मार्गावर शनिमंदिर, गिरड दर्गा, रामदेगी देवस्थान ही धार्मिक स्थळे असल्याने येथे येणाºया भाविकांसाठीही हा मार्ग सोयीचा ठरणार आहे.या मार्गावरील प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग यांना दर्जोन्नात करून त्यांना राज्य मार्गाचा दर्जा देऊन या मार्गाला विकसित करण्यात यावे, यासाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, प्रत्यक्ष भेटून विनंती केली होती. त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही त्यांनी पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटून विनंती केली. विविध तपासांती आणि अहवालानंतर मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग यांनी अपर सचिव(नियोजन) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पत्राद्वारे या मार्गाच्या दर्जोनत्तीचा प्रस्ताव सादर केला आहे. अखेर या मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने हे चांगले पाऊल आहे. या नव्या मार्गामुळे नागपूरपासून केवळ ८७ किलोमीटरवर ताडोबाचे नवेगाव गेट पडणार आहे. या मार्गासाठी आपला सातत्याने प्रयत्न सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी, ना. सुधीर मुनगंटीवार, ना. चंद्रकांत पाटील आणि ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारामुळे या मार्गाला मंजुरी मिळाली आहे.-आ. कीर्तीकुमार भांगडिया, चिमूर विधानसभा क्षेत्र.