चंद्रपूर : लाॅकडाऊन सुरू करताना शासनाने प्राधान्य गट तसेच अंत्योदयमधील कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. मात्र केशरी (एपीएल) कार्डधारकांना धान्य मिळत नसल्यामुळे अनेकांचे हाल होत होते. दरम्यान, आता केशरी कार्डधारकांनाही जून महिन्यात सवलतीच्या दरात धान्य देण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ५९ हजार १५३ कार्डधारकांना लाभ मिळणार आहे.
लाॅकडाऊनमुळे अनेक गरीब तसेच गरजू कुटुंबाचे आर्थिक नुकसान होत आहे. या कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला आहे. दरम्यान, गरीब कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी जिल्ह्यातील प्राधान्य गटातील २ लाख ६१ हजार ०३१ कार्डधारक असलेल्या १० लाख ३७ हजार ७०५ लाभार्थ्यांना तसेच प्राधान्य गटातील १ लाख ३७ हजार १४५ कार्ड असलेल्या ५ लाख ११ हजार ७०० लाभार्थ्यांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली. यामुळे काही प्रमाणात का होईना या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे. त्यातच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गतही धान्य मिळाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील ५९ हजार १५३ कार्डधारक असलेले १ लाख ८९ हजार ७७५ लाभार्थ्यांना कोणताही लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. विशेष म्हणजे, मागील वर्षी लाॅकडाऊन झाल्यानंतर या कार्डधारकांनाही सवलतीच्या दरात धान्य देण्यात आले होते. त्यामुळे यावर्षीही धान्य मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र धान्य पुरवठ्यासंदर्भात शासनाने निर्णयच घेतला नव्हता. आपल्यालाही धान्य मिळावे यासाठी केशरी कार्डधारक रेशन दुकान तसेच पुरवठा कार्यालयात चकरा मारत होते. त्यामुळे राज्य सरकारने या कार्डधारकांनाही धान्य देण्याची घोषणा केली आहे. यानुसार प्रति लाभार्थी १ किलो गहू, तसेच एक किलो तांदूळ देण्यात येणार आहे. यामध्ये गहू ८ रुपये तर तांदूळ १२ रुपये किलो प्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. यामध्येही मागील वर्षी वितरणाअंती शिल्लक असलेल्या धान्यातूनच सदर धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. ज्या रास्तभाव दुकानात धान्य शिल्लक आहे त्या दुकानातून प्रथम मागणी करणाऱ्यास प्रथम या तत्वानुसार धान्य वितरण करण्यात येणार आहे.
बाॅक्स
४,५७,३२९
जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक
२,६१०३१
बीपीएल
१,३७,१४५
अंत्योदय
५९,१५३
केशरी
बाॅक्स
काय मिळणार ?
प्रति माणसी
१ किलो गहू
१ किलो तांदूळ
बाॅक्स
प्राधान्यच्या
२ लाख ६१ हजार कार्डधारकांना लाभ
१. प्राधान्य गट योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ६१ हजार ३१ कार्डवर १० लाख ३७ हजार ७०५ नागरिकांना मोफत धान्य मिळाले आहे.
२. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात अंत्योदय कार्डधारकांची संख्या १ लाख ३७ हजार १४५ आहे. या माध्यमातून ५ लाख ११ हजार ७०० नागरिकांना मोफत धान्याचा लाभ मिळाला आहे.
२. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गतही प्राधान्य गट तसेच अंत्योदय कार्डधारक लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ किलो धान्य मोफत दिले जात आहे.
बाॅक्स
केशरीच्या ५९ हजार कार्डधारकांना मिळणार धान्य
जिल्ह्यात एपीएल केशरी कार्डधारकांची संख्या ५९ हजार १५३ असून लाभार्थी संख्या १ लाख ८९ हजार ७७५ आहे. या सर्व लाभार्थ्यांना शासनाने जाहीर केलेल्या नव्या आदेशान्वये जून महिन्यामध्ये सवलतीच्या दरामध्ये त्यांना धान्य देण्यात येणार आहे. या नव्या आदेशामुळे काही प्रमाणात का, होईना केशरी कार्डधारकांना दिलासा मिळणार आहे.
कोट
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांनाही जून २०२१ करिता प्रति सदस्य एक किलो गहू, एक किलो तांदूळ देण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे. सदर धान्य गहू ८ रुपये तसेच तांदूळ १२ रुपये प्रति किलो या दराने मिळणार आहे.
-भारत तुंबडे
पुरवठा निरीक्षण अधिकारी,चंद्रपूर