घनश्याम नवघडे
नागभीड : आता दर तीन महिन्यांनी सरपंचांची सभा होणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने मंगळवारी तसे निर्देशच दिले आहेत. ही सभा गट विकास अधिकारी यांनी आयोजित करावयाची आहे. राज्यात सर्वत्र नवीन सरपंच पदारूढ होत आहेत, या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे सरपंच वर्तुळात स्वागत होत आहे.
नवीन पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतींना विविध अधिकार बहाल करण्यात आले आहेत. आता ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य शासनाचा थेट निधीही मिळत आहे. अनेक ग्रामपंचायती चांगली कामेही करीत आहेत. मात्र ग्रामपंचायतींची कामे वेळेवर होत नसल्याबाबतच्या अनेक तक्रारी व निवेदने राज्याच्या ग्रामविकास विभागाला प्राप्त झाली होती. या बाबी विचारात घेऊन गट विकास अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर सभेत पंचायत विस्तार अधिकारी व इतर कर्मचारी, संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांची आढावा बैठक घेऊन तक्रारी, गाऱ्हाणी व अडचणींची सोडवणूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सदर सभा दर तीन महिन्यांनी नियमितपणे आयोजित करावी व ज्या दिवशी तक्रार निवारण दिन आहे त्याचदिवशी सदर सभेचे आयोजन करावे, असेही यात म्हटले आहे. गटविकास अधिकारी यांना सभा घेतल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पाच दिवसात सभेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवावा लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सात दिवसांत विभागीय आयुक्तांना पाठवायचा आहे. त्यानंतर विभागीय आयुक्त दहा दिवसांत शासनाकडे पाठवतील.