राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटीतून प्रवास करणारे सवलतधारक व सामान्य प्रवाशांना आता कागदी पास न देता राज्य परिवहन महामंडळाकडून विशिष्ट चिप बसवलेले, बँक व आधारकार्डशी लिंक असलेले अत्याधुनिक स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. या लोकोपयोगी मोहिमेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी मागील २० दिवसांपासून चंद्रपूर आगारात नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. स्मार्ट कार्ड घेण्यासाठी सदर प्रवाशांकडून केवळ ५५ शुल्क घेतल्या जात असून हे कार्ड कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला वापरण्याची मूभा असणार आहे.राज्य परिवहन महामंडळ अवैध खासगी प्रवासी वाहतुकीच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून लोकाभिमुख योजनांवर भर देत आहे. यातील काही योजना यशस्वी तर काही अपयशी ठरल्याची टीका सातत्याने केली जाते. परंतु, राज्यात कुठेही सुरक्षित प्रवास करता यावा, या हेतूने प्रवाशांकरिता नवनवीन सवलती योजना तयार करण्यात अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र एक पाऊल पुढेच टाकत असल्याचे दिसून येते. स्मार्ट कार्ड ही अत्याधुनिक सवलत योजनाही त्याचाच भाग असल्याचे एसटीतील अधिकारी सांगताहेत. राज्यातील काही आगारांमध्ये ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, त्यातील तांत्रिक दोष दूर न झाल्याने प्रवासी व वाहकांमध्ये भांडणे वाढली. प्रवाशाला दिलेले स्मार्ट कार्ड हे ट्रायमॅक्स मशीनशी न जुळणे हा सर्वात मोठा दोष राज्य परिवहन महामंडळासाठी डोकदुखी ठरला होता. दरम्यान, परिवहन महामंडळाच्या अधिनस्थ तज्ज्ञांनी सखोल अभ्यास करून स्मार्ट कार्डमधील दोष दूर केले. शिवाय, एसटी महामंडळाला आर्थिक नफा मिळवून देण्यास उपयुक्त ठरत असल्याचा निष्कर्ष पुढे आला. त्यामुळे स्मार्ट कार्ड सवलत योजना राज्यातील ३० विभागीय आगारांमध्ये तातडीने लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चंद्रपूर आगारात तातडीने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.असे आहे स्मार्ट कार्ड५५ रूपये भरून प्राप्त केलेल्या स्मार्ट कार्डच्या चिपमध्ये विविध प्रकारची माहिती नोंदविण्यात येते. बस पासधारकाचे नाव, सवलत आणि बसचा प्रकार कोणता, सदर प्रवासी किती किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करणार, प्रवास सवलतीची मुदत किती दिवसांची इत्यादी माहितीचा यामध्ये समावेश राहणार आहे. हे स्मार्ट कार्ड संबंधित प्रवाशांच्या आधारकार्डला जोडण्यात येणार आहे. स्मार्ट कार्ड हस्तांतरणीय असल्याने कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला वापरता येते.स्मार्ट कार्डसाठी नुतनीकरणमोफत प्रवास करण्यासाठी एसटीकडून ज्येष्ठ नागरिक, अधिस्वीकृती पत्रकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारर्थी, दिव्यांग, गुणवंत, महात्मा गांधी समाजसेवा व आदिवासी सेवकांना सवलत पास दिल्या जाते. यापूर्वी त्यांना दिलेले कागदी पास रद्द करून नवीन स्मार्ट कार्ड वितरण केल्या जाणार आहे. याकरिता मागील २० दिवसांपासून चंद्रपूर आगारात नुतनीकरण प्रक्रिया सुरू आहे.एटीएम म्हणूनही करता येईल वापरस्मार्ट कार्डचा एटीएम म्हणूनही वापर करता येतो. कार्डमध्ये सुरूवातीला किमान ५०० रूपये भरावा लागणार आहे. कोणत्याही बस आगारात कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्मार्ट कार्डसाठी खासगी बँकेसोबत राज्य परिवहन महामंडळाने करार केला आहे.नव्याने तयार केलेला स्मार्ट कार्ड अत्याधुनिक आहे. पासधारक व अन्य प्रवाशांना हे स्मार्ट कार्ड वरून सुखाचा प्रवास करता येणार आहे. नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली. नवीन आर्थिक वर्षापासून हे कार्ड संबंधित प्रवाशांना वितरण केल्या जाईल.-आर. एन. पाटील, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर
आता एसटी देणार प्रवाशांना ‘स्मार्ट कार्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 12:45 AM