चंद्रपूर : जुनी पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला असतानाच आंदोलनाच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषदेमधील सर्व राजपत्रित अधिकारी, विभाग प्रमुखकांनी जिल्हा परिषदेच्या आंदोलनस्थळी येऊन जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे आता शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून येत असून ते ओस पडले आहेत. यासोबतच जिल्ह्याभरात कुठे सायकल रॅली, तर कुठे दुचाकी रॅली काढून शासकीय कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. मात्र चार दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जिल्ह्यातील १८ हजार कर्मचारी सहभागी झाले. पहिल्या दिवसांपासूनच काम बंद केल्याने दैनंदिन प्रशासकीय कामकाज कोलमडले. दरम्यान शुक्रवारी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. चंद्रपूर जिल्हा शाखेचे पदाधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी आम्हाला जरी जुनी पेन्शन लागू असली तरी नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, असे मत मांडले.
या अधिकाऱ्यांची उपस्थिती
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी अशोक मातकर, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे (प्राथ), शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण (माध्य.), कार्यकारी अभियंता, प्रकल्प संचालक आदी उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांची खासदारांनी घेतली भेट
राज्य सरकारीकर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात १४ मार्चपासून चंद्रपूर जिल्ह्यात बेमुदत संप सुरू आहे. वरोरा येथे सुरू असलेल्या आंदोलनात खासदार बाळू धानोरकर यांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनकर्त्यांना संबोधितही केले. तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष प्रशांत डवले, उपाध्यक्ष सचिन पाल, सचिव मोहना पोटे यांनी राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव खरवडे यांच्या नेतृत्वात पाठिंबा दिला. तर महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटनेचे सुभाष मेश्राम यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक जेऊरकर यांना भेटून पाठिंबा दिला.