वरोरा शहरात सध्याच्या काळात गरजूंना जेवण मिळावे, याकरिता दोन केंद्रातून मोफत ३०० प्लेट जेवण सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत देण्यात येत आहे. या मोफत जेवणासाठी गरजू व्यक्ती पहाटेपासून कुटुंबासह रांगेत लागत आहे. दोन्ही केंद्रावरील तीनशे भोजन प्लेट अवघ्या काही वेळातच संपून जाते. त्यामुळे अनेकांना भोजनविना परत जावे लागत आहे. अशातच गरजूंना शासनाने घोषणा करूनही गहू व तांदळाचे वाटप केले नाही. त्यामुळे गरजूंची अवस्था भोजन नाही व धान्य नाही, अशी बिकट झाली आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेतली.
गहू व तांदळाचे तातडीने वाटप
वरोरा व भद्रावती तालुक्यात लाभार्थ्यांना गहू व तांदळाचे तातडीने वाटप करण्यात येणार असून, वरोरा तालुक्यात चार हजार दोनशे क्विंटल गहू तर तीन हजार १५० क्विंटल तांदूळ, भद्रावती तालुक्यात २,९४० क्विंटल गहू व १,४७० क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात येणार आहे.
कोट
दोन्ही शिवभोजन केंद्रातील थाळी संख्या वाढविणार असून, नवीन शिव भोजन केंद्राची मागणी आल्यास मंजुरीकरिता प्रस्ताव पाठविणार. गरजूंना तांदूळ व गव्हाचे वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- सुभाष शिंदे उपविभागीय अधिकारी वरोरा.