शंकरपूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहत असल्याने रुग्णांवर परिचारिकेला उपाचार करावे लागत आहे. दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्ती असताना एकही वैद्यकीय अधिकारी रूग्णालयात हजर राहत नाही. परिणामी रुग्णांची हेळसांड होत आहे.शंकरपूर हे १० हजार लोकवस्तीचे गाव आहे. परिसरात पाच उपकेंद्र असून शंकरपूर गावसोबतच परिसरातील २८ गावे प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडली आहेत. रुग्णांना सेवा देण्यासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, यातील एक वैद्यकीय अधिकारी मागील तीन महिन्यापासून वैद्यकीय रजेवर आहे. यामुळे येथील कारभार एक वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहे. सोमवारी रुग्णालयात प्रस्तुत प्रतिनिधीने फेरफटका मारला असता, कार्यरत वैद्यकीय गैरहजर असल्याने रुग्णांची तपासणी दुर्गे नामक परिचारिका करीत होत्या. सोमावारी शंकरपूर येथील आठवडी बाजार असल्याने रुग्णांची गर्दी होती. रुग्णांच्या तपासणीसाठी बाहेरुन वैद्यकीय अधिकारी पाठवून तपासणी करायला पाहिजे होते. परंतु, तसे न करता एका परिचारिकेच्या हाताने रुग्णांवर उपचार करण्यात आला. सायंकाळी ४ वाजेपर्यंत १५५ रुग्ण तपासण्यात आले होते. शंकरपूर व परिसरात कावीळ सारखा रोगाने थैमान घातले आहे. यात आजपर्यंत चार ते पाच रुग्ण दगावले आहे. असे असतानाही वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रा. आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष केले आहे. शंकरपूर प्रा. आरोग्य केंद्रात अंतर्गत २८ गावे जोडली असल्याने जनतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आशेचे किरण आहे. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांची असुविधा आहे. (वार्ताहर)
परिचारिका करतात रुग्णांची तपासणी
By admin | Published: January 05, 2015 11:00 PM