चंद्रपूर : नीटच्या धर्तीवर होणाऱ्या राज्यातील बीएसस्सी नर्सिंग प्रवेशाला राज्य सरकारने वेळीच विरोध न केल्याने यंदाच्या नर्सिंग प्रवेशाला आधीच उशीर झाला. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयानंतर नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रवेश आता नीट ऐवजी बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र (पीसीएमबी) तसेच इंग्लिशमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे. नर्सिंग प्रवेशाच्या पहिल्या फेरीनंतर न्यायालयाचा निर्णय आला होता. त्यानुसार बारावीच्या धर्तीवर होणाऱ्या नव्या प्रवेशासाठी पुन्हा नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे नर्सिंग प्रवेश पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
राज्यातील नर्सिंग प्रवेशाच्या पहिल्या फेरीत सुमारे १२०० प्रवेश झाले आहेत. या प्रवेशांना संरक्षण देत हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचा फायदा नीट परीक्षेत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना होणार आहे. प्रायव्हेट नर्सिंग स्कूल ॲण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन (पीएनएससीएमए) च्या सदस्यांनी कॉमन एंटरन्स टेस्ट (सीईटी) सेलला न्यायालयाच्या आदेशानुसार बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रमासाठी पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राज्यातील बीएसस्सी नर्सिंगच्या ५ हजार १६४ जागांसाठी बारावीच्या गुणांआधारे नव्याने प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल आणि खासगी नर्सिंग स्कूल ॲण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशनने सर्व नर्सिंग कॉलेज व्यवस्थापन, प्राचार्य प्राध्यापक आणि इच्छुक विद्यार्थ्यांसोबत नवीन प्रवेश पद्धतीवर चर्चा करण्यासाठी ऑनलाइन सत्र राबविण्यात येणार आहे. मात्र, राज्य सरकारने यापूर्वी वेळीच पाठपुरावा केला असता तर पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबविण्यची वेळच आली नसती, आता नवीन प्रक्रियेला सुरुवात होणार असली तरी प्रवेशासाठी पुन्हा विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.