लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी चंद्रपुरात संविधान दिनी २६ नोव्हेेंबर रोजी ओबीसी समाजातर्फे विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहामध्ये ओबीसी अधिवक्तांची बैठक पार पडली. यावेळी सहकुटुंब मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ व कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष ॲड. पुरूषोत्तम सातपुते, प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ विधिज्ञ व जिल्हा प्रचारक गुरुदेव सेवा मंडळचे ॲड. दत्ता हजारे, ॲड. फरहात बेग यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये सर्व ओबीसी अधिवक्तांनी आपल्या कुटुंबासोबत मोर्चात सहभागी होण्याचे निर्धार केला असून ओबीसींची एकता दाखविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. बैठकीला ॲड. जयंत साळवे, ॲड. जावेद शेख, ॲड. प्रवीण कौरसे, ॲड. जुमडे, ॲड. किरण आवरी, ॲड. प्रवीण पिसे, ॲड. मनोज मांदाडे, ॲड. अनुप हजारे, ॲड. मनिष काळे, ॲड. सुजय घडसे, ॲड. प्रशांत सोनुले यांची उपस्थिती होती. मोर्चाच्या पुढील नियोजनासाठी २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
काँग्रेस ओबीसी विभागही मोर्चात होणार सहभागी चंद्रपूर : ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना व इतर मागण्या घेऊन ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने चंद्रपूरमध्ये संविधान दिन २६ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे यांनी समर्थन जाहीर केले आहे. यासंदर्भात त्यांनी समन्वय समितीकडे पत्र दिलेय सोपविली. यावेळी समन्वय समितीचे डॉ. राकेश गावतुरे, प्रा. विजय बदखल, बंडू हजारे, डॉ. अभिलाषा गावतुरे, सतीश मालेकर, रुदा कुचनकर, बळीराज धोटे आदींची उपस्थिती होती.