चंद्रपूर : मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींचे ७२ वसतिगृह, आधार योजना राबवावी, २६ जानेवारीला काढलेली अधिसूचना तत्काळ रद्द करावी यासाठी सेवाग्राम येथून ओबीसी जनगणना संकल्प यात्रा काढण्यात आली. या यात्रेचा समारोप १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभूमी येथे होणार आहे. तत्पूर्वी चंद्रपूर येथील वडगाव ते दीक्षाभूमीपर्यंत ओबीसी बांधव पैदल मार्च काढून शासनाचे लक्ष वेधणार आहेत.
यात्रा नियोजन करण्यासाठी येथील धनोजे कुणबी समाज मंदिर, वडगांव, चंद्रपूर येथे ओबीसी बांधवांची बैठक पार पडली. विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतून ही यात्रा ब्रह्मपुरी येथे पोहचणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य शहरांसोबतच ग्रामीण भागातूनसुद्धा यात्रा मार्गक्रमण करणार असून १२ फेब्रुवारीला चंद्रपूर शहरात दाखल होणार आहे. ओबीसी जनगणना संकल्प यात्रा संयोजक उमेश कोर्राम, संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली आहे.
यात्रा नियोजन करण्यासाठी धनोजे कुणबी समाज मंदिर, वडगांव, चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी सूर्यकांत खनके, प्रमुख मार्गदर्शक ॲड. पुरुषोत्तम सातपुते, नंदू नागरकर, यात्रा संयोजक प्रा. अनिल डहाके व हिराचंद बोरकुटे, लक्ष्मणराव धोबे, विजयराव टोंगे, संदीप गिर्हे, प्रा. नरेंद्र बोबडे, सुनील मुसळे, डॉ. कांबळे, अनिल शिंदे, अवधूत कोठेवार, विलास माथानकर, प्रा. सुरेश विधाते, गोमती पाचभाई, धीरज तेलंग, विठ्ठल मुडपल्लीवार, शैलेश इंगोले, राजेंद्र पोटदुखे, सुधाकर श्रीपूरकर, डॉ. किशोर जेनेकर, राहुल विरुटकर, उदय कोकोडे, राहुल भोयर, अतुल देऊळकर डॉ. मीना माथनकर, देवराव सोनपितरे, प्रलय म्हशाखेत्री आदी उपस्थित होती.
चंद्रपूर शहरात अशी निघणार यात्रा१२ फेब्रुवारीला सायंकाळी ५:३० वाजता वडगांव फाटा, जनता कॉलेज चौक, वरोरा नाका, प्रियदर्शनी सभागृह जिल्हा परिषद, जटपुरा गेट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बॅ. खोब्रागडे स्मारक, दवाबाजार, रामनगर चौक मार्गे दीक्षा भूमी चंद्रपूर येथे यात्रेचा समारोप होणार आहे.