हक्कासाठी अधिवेशन : आंदोलन व मोर्चाचंद्रपूर : ओबीसी समाजाच्या विकासासाठी विदर्भातील विविध ओबीसी संघटनांना एकसंघ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी केले. ओबीसी कृती समितीची विदर्भस्तरीय बैठक धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात रविवारी पार पडली. या प्रसंगी विविध ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी विषयावर मत मांडले. बैठकीत ८ आॅगस्टला एक दिवसीय विदर्भस्तरीय अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या वा चौथ्या दिवशी विधानसभेवर मोर्चा नेण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार पांडुरंग ढोले व सेवक वाघाये, ज्येष्ठ विचारवंत जेमिनी कडू, ओबीसी कृती समितीचे सचिन राजूरकर उपस्थित होते. डॉ. तायवाडे म्हणाले, आता बैठक किंवा चर्चा करून ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत. कृतीची गरज आहे. यासाठी संघटनांनी एकत्रितरीत्या काम केले पाहिजे. एवढेच नव्हे तर आंदोलनाला जिवंत ठेवायचे असेल तर विविध कार्यक्रम राबवावे लागेल. ८ आॅगस्टला धनवटे नॅशनल कॉलेजच्या पंजाबराव देशमुख सभागृहात होणाऱ्या एक दिवसीय अधिवेशनात वेगवेगळ्या विषयावर चार चर्चासत्र घेण्यात येणार आहे. मंंत्री अथवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मागण्यांच्या निवेदनासाठी कायमस्वरूपी कागदपत्रे तयार करण्यात येणार आहे. हे निवेदन त्या त्या जिल्ह्यातील ओबीसी संघटना जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहे. याद्वारे आंदोलनाचा मार्ग सुकर होईल. विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्यात येईल. ओबीसींना न मिळालेल्या मंडल आयोगातील शिफारशी आणि विविध अध्यादेशावर चर्चा होणार आहे. आंदोलनासाठी निधी गोळा करण्यात येणार आहे. हे अधिवेशन ओबीसींच्या आंदोलनासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास तायवाडे यांनी व्यक्त केला. शिष्यवृत्ती, जात प्रमाणपत्र व पडताळणी, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र वा अन्य प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी आणि नोकरदार शासनस्तरावर नाडला जात आहे. ओबीसीला मिळणाऱ्या सवलतींसंदभातील अध्यादेशाची माहिती केंद्र व राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांना नसल्यामुळे विद्यार्थी व नोकरदारांना पुरेसा लाभ मिळत नाही. सर्व शासकीय योजनांची माहिती समाजाला देण्याची गरज आहे. विविध ओबीसी संघटनांनी एकत्रितरीत्या काह्य केल्यास सर्वांगीण विकास निश्चितच असल्याचे मत विविध ओबीसी संघटनांच्या नेत्यांनी मांडले.बैठकीला अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजाचे अध्यक्ष भूषण दडवे, ओबीसी कृती समितीचे संयोजक सचिन राजूरकर, शरद वानखेडे, प्रा. डॉ. नंदकिशोर राऊत, राजेश पिसे, मनोज चव्हाण, खेमेंद्र कटरे, विजय तपाडकर, प्रा. विलास काळे, रमेश मडावी, नारायण ह्यत्ते, नितीन मत्ते, सुषमा भड, गुनेश्वर आरेकर, डी. डी. पटले, शुभांगी घाटोळे यांनी विषयावर मत मांडले. प्रारंभी सचिन राजूरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शेषराव येलेकर यांनी संचालन तर शरद वानखेडे यांनी आभार मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
विकासासाठी ओबीसींनी एकसंघ व्हावे
By admin | Published: June 29, 2016 1:15 AM