चंद्रपूर-घुग्घुस वळण मार्गासाठी घुग्घुस, म्हातारदेवी शिवारातील जमिनी संपादित केल्या. मात्र, मध्यंतरी असलेल्या शेत जमिनीचे भूसंपादन न करता घुग्घुस व म्हातारदेवीच्या मध्यभागाच्या दोन्ही बाजूने वळण मार्गाचे काम पूर्ण होऊन मार्ग वाहतुकीसाठी तयार आहे. परंतु मध्यभागी असलेल्या शेतमालकांनी आक्षेप घेतल्याने रस्त्याचे बांधकाम अडले. त्या शेतकऱ्यांनी न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी संबंधित विभागाचा प्रकल्पग्रस्तांसोबत समझोता व्हावा यासाठी वारंवार बैठकी झाल्या. मात्र, योग्य तोडगा निघाला नाही.
दरम्यान, शुक्रवारी उर्वरित प्रकल्पग्रस्तांशी चर्चा व शंकेचे निराकरण करण्यासाठी जनसुनावणीचे घुग्घुस नगर परिषदेच्या कार्यालयात आयोजन करण्यात आले. अधिकांश प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. मात्र, एका प्रकल्पग्रस्ताने ताठर भूमिका मांडली. त्याचे निराकरण शक्य झाले नाही. आता वळण रस्त्याबाबत बांधकाम विभाग काय भूमिका घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. जनसुनावणीत उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अभियंता एस. डी. मेंढे, सहाय्यक अभियंता के. एस. येंडे, मुख्याधिकारी आर्शिया जुही यांची उपस्थिती होती.