भद्रावती : राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात १०० दिवस राबविण्यात येणारे महा आवास अभियान-ग्रामीण राबविण्यासाठी येथील पंचायत समितीत तालुका स्तरिय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डाॅ. मंगेश आरेवार, तहसीलदार महेश शितोळे, बॅंकेचे प्रतिनिधी, विस्तार अधिकारी, अभियांत्रिकी सहाय्यक चंद्रकांत सावळे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता मिलिंद नागदेवते, राकेश तुरारे, डाटा एन्ट्री परिचालक नितीन वेलपुलन्वार, तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक तलाठी उपस्थित होते.
कार्यशाळेत अभियान कालावधीत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करुन उद्दिष्टपुर्ती करण्याकरीता कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करुन देणे, अतिक्रमण असलेल्या लाभार्थ्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करणे, घरकुलांच्या उद्दिष्टानुसार मंजुरी देऊन अनुदानाचे हप्ते वितरित करणे घरकुलाच्या उद्दिष्टानुसार घरकुले भौतिक व आर्थिक दृष्ट्या पूर्ण करणे, अपूर्ण घरकुले पूर्ण करणे इत्यादी कामे १०० टक्के पूर्ण करण्याकरीता गटविकास अधिकारी यांनी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता तसेच सर्व ग्रामपंचायत सचिवांना आवाहन केले.
अभियान कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करुन मूल्यमापनात समोर आलेल्या अभियानात उत्कृष्ट कार्य करणा-या विभाग, जिल्हे, तालुके, ग्राम पंचायती, लाभार्थी यांच्या कामाचा प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गट विकास अधिकारी आरेवार यांनी दिली. अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी तहसीलदार महेश शितोळे यांनी भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलाकरीता जागा उपलब्ध करुन देणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे याबाबत माहिती विषद केली व त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सर्वांसाठी घरे-२०२२ हे केंद्र शासनाचे महत्वाकांक्षी धोरण राज्य शासनाने स्वीकारले असून सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी ''''प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण'''' अंतर्गत २० नोव्हेंबर २०२० पासून २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सदर अभियान राबविण्यात येणार आहे.