वनविभागाने अकारण दोन ट्रॅक्टर केले जप्त
मूल : शेतीच्या हंगामाला सुरुवात झाल्याने वडिलोपार्जीत शेती करण्यासाठी ट्रॅक्टर शेतात लावून मातीकाम करीत असताना मूल येथील वनविभागाच्या बफर क्षेत्रातील वनरक्षक गेडाम यांनी शेतात येऊन, वनविभागाच्या जागेवर काम करीत असल्याचे सांगून शेतीकाम बंद केले. दरम्यान, वनपरिक्षेत्राधिकारी नायगमकर आणि क्षेत्र सहा. पाकेवार यांनी शेतात येऊन भादुर्णा येथील वननाक्यावर ट्रॅक्टर जमा केले.
दरम्यान, ऐन शेतीच्या हंगामामध्ये शेती करण्यापासून वनविभागाने अडवणूक केली असून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप आदिवासी शेतकरी नंदादीप मडावी यांनी केला आहे.
मूल तालुक्यातील मौजा शिवापूर चक येथील सव्हे नं. ७८ मधील ३.१६ हे. आर. जमीन नंदादीप मडावी, शोभाताई नामदेव गेडाम आणि वंदना सुधीर उईके यांच्या मालकीची आहे. या शेतात मागील अनेक वर्षांपासून पीक घेतले नाही. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात झुडूप आणि रांजा वाढले आहे. नंदादीप मडावी हे यावर्षी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यामुळे त्यांनी शेतातील झुडूप आणि रांजा काढण्यासाठी १० मे रोजी सकाळी दोन ट्रॅक्टर लावून कामाला सुरुवात केली. दरम्यान वनविभागातील बफर क्षेत्रातील वनरक्षक गेडाम यांनी शेतात येऊन ट्रॅक्टरने सुरू असलेले काम बंद केले. मडावी यांनी शेतात जाऊन वनरक्षक गेडाम यांना शेताची हद्द दाखविली. मात्र, त्यांनी काहीच न ऐकता क्षेत्र सहा. पाकेवार आणि वनपरिक्षेत्राधिकारी नायगमकर यांना बोलाविले. त्यांनीही न ऐकता पंचनामा करून ट्रॅक्टर जप्त केलेे.
याबाबत जिल्हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना माहिती दिली. त्यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले. मात्र, अजूनही ट्रॅक्टर सोडण्यात आले नाही. यामुळे मडावी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोट
मडावी यांची शेती वनविभागाच्या एका गट नंबरला लागून आहे. यामुळे त्यांनी संयुक्त मोजणी करायला पाहिजे. परंतु त्यांनी मोजणी करण्याआधीच वनविभागाची परवानगी न घेता झाडेझुडूपे तोडली. यामुळे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
-जी. आर. नायगमकर, वनपरिक्षेत्राधिकारी, बफर झोन.