नागरिक त्रस्त : नगर पालिकेने लक्ष देण्याची मागणीआयुधनिर्माणी (भद्रावती) : भद्रावती नगरपालिकेने शहरातील नागरिकांच्या सुखसोयीसाठी मुख्य मार्गाचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण केले. परंतु फुटपाथवर अद्यापही दुकानदारांचाच कब्जा असल्याने नागरिकांचा फुटपाथवरुन चालणाऱ्यांचा अधिकार हिरावला जात आहे. दुसरीकडे या अवैध कब्जामुळे शहरात पार्किंगची व्यवस्था बाधीत झाली असून नागरिकांना रस्त्यावरुन चालण्यासाठी हक्काचा फुटपाथ मिळेल का, अशी विचारणा नागरिक करत आहे.भद्रावती शहरात मुख्य मार्गाचे रुंदीकरण झाले असून रस्ता अत्याधुनिक बनवण्यात आला आहे. रस्त्यावरुन वाहने व फुटपाथवरुन पादचाऱ्यांना जाता येईल, अशी अपेक्षा होती. परंतु शहरातील मुख्य मार्गाचा फेरफटका मारला असता फुटपाथ केवळ नामधारीच उरला असून त्याचा फायदा दुकानादारच मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे दिसत आहे. बुधवार हा भद्रावती शहरातील आठवडी बाजाराच दिवस असतो. या दिवशी परिसरातील ग्रामस्थ बाजार हाटाकरीता आपापल्या वाहनांनी येत असतात. या दिवशी फुटपाथवर निदान वाहने तरी उभी ठेवता येईल अशी परिस्थिती नसल्याने भर रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त उभी ठेवण्यात येतात. त्यामुळे वाहतुक व्यवस्था कोलमडून नागरिकांना त्रासाला समोरे जावे लागते. ऐन वर्दळीच्या गांधी चौकातील महाराष्ट्र बँकेच्या बाजुचा एक दुकानदार तर चक्क दोराचे कंपाउंड करुन चौकात पार्किंगची समस्या निर्माण करतो. पालिकेने पुढाकार घेऊन नागरिकांना हक्काचा फुटपाथ उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
भद्रावती शहरातील फुटपाथवर व्यावसायिकांचा कब्जा
By admin | Published: January 13, 2017 12:35 AM