पावसात येते तलावाचे स्वरूप
घनश्याम नवघडे
नागभीड : येथील लघु पाटबंधारे उपविभागीय कार्यालयाला दरवर्षीच पाण्याशी संघर्ष करावा लागत आहे. या संघर्षात हे कार्यालय कधी आपले अस्तित्व गमावून बसेल, हे सांगता येत नाही.
नागभीड-ब्रम्हपुरी तालुक्यातील मामा तलावांचे व इतर छोट्या सिंचनविषयक कामांचे नियोजन करण्यासाठी नागभीड येथे उपविभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. नागभीड-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गाला लागूनच या कार्यालयाची इमारत आहे. १ जानेवारी १९८६ रोजी नागभीड येथे या उपविभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. तेव्हा ही इमारत बांधण्यात आली. या इमारतीला आता ३५ वर्षे होत आहेत. त्यावेळी नागभीड-ब्रम्हपुरी या मार्गाच्या समांतर ही इमारत बांधण्यात आली असेलही; पण गेल्या ३५ वर्षांत या मार्गाचे अनेकदा नूतनीकरण करण्यात आल्याने रस्त्याची उंची कमालीची वाढली आणि इमारत अतिशय खोल गेली.
पावसाळ्याच्या दिवसात या इमारतीच्या परिसरात तिन्ही बाजूचे पाणी जमा होत असते. मात्र या पाण्याचा निचरा होण्यास मोठा वाव नसल्याने या इमारतीभोवती तलावाचे स्वरूप प्राप्त होते. अगदी मध्यम स्वरूपाचा पाऊस आला, तरी ही स्थिती निर्माण होत असते. ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. जोराचा पाऊस झाला की बाजूनेच वाहणाऱ्या कसर्ला तलावाच्या नहराचे पाणीही येथे घुसत असते. पावसाळ्यात या इमारतीत प्रवेश करण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. यावर उपाय म्हणून यावर्षी इमारतीच्या दर्शनी भागात मुरूमाचे भरण भरण्यात आले असले, तरी इमारतीच्या प्रांगणातील तलावाचे स्वरूप कायम आहे.
बॉक्स
इमारतही जीर्ण
तसेही ही इमारत आता रहाटीसाठी योग्य राहिली नाही. चार वर्षांपूर्वी या इमारतीची काही प्रमाणात डागडुजी करण्यात आली होती, अशी माहिती आहे. मात्र अद्यापही या इमारतीला तडे जाण्याचे प्रकार सुरूच आहेत. पावसाळ्यात तर ही इमारत ठिकठिकाणी गळतेसुद्धा. सिंचाई विभागाने या इमारतीचे परीक्षण करून निर्लेखन करण्यात यावे, असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला कळविले आहे. मात्र या विभागाकडून काहीही हालचाली नाहीत.
240721\img_20210724_105125.jpg
कार्यालयाभोवती असे साचते पाणी