चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२१अंतर्गत चंद्रपूर शहरातील शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, बाजार समिती, हॉटेल्सची स्वच्छताविषयक नोव्हेंबर महिन्यात तपासणी करण्यात आली होती. यामध्ये शासकीय कार्यालयात पोलीस अधीक्षक कार्यालय प्रथम आले आहे.
या अंतर्गत रुग्णालये विभागात बेंडले हॉस्पिटल, शाळांमध्ये बजाज विद्या भवन, बाजार संघटनेमध्ये बंगाली कॅम्प मार्केट, गृहनिर्माण संस्था, मोहल्ला या विभागात बंगाली कॅम्प एरिया व हॉटेल्स विभागात एन. डी. हॉटेल यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१अंतर्गत शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालये, संस्था, हॉटेल्सची स्वच्छताविषयक तपासणी करण्यात आली. निकषानुसार गुणानुक्रमांक देण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानाचा अधिकाधिक प्रसार होऊन यात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात मनपा हद्दीतील विविध शासकीय कार्यालये, संस्था, रुग्णालये, शाळा, बाजार संघटना, हॉटेल्सची स्वच्छताविषयक तपासणी महानगरपालिकेद्वारे करण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षण २०२१अंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार कार्यालय, संस्था हॉटेल्स यांना स्वच्छतेच्या मापदंडावर पात्र ठरविण्यात आले. अशा प्रतिष्ठानांना पालिकेतर्फे सर्वांत स्वच्छ घोषित करण्यात आले आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.