काही अधिकाऱ्यांनी सुटी घेतली हे समजसारखे आहे. परंतु, मनपा आयुक्तांसह सर्व प्रमुख अधिकारी एकाच दिवशी रजेवर गेल्याने मनपाचा कारभारच ठप्प झाला आहे. या मंडळींनी दाेन दिवसांच्या रजा घेतल्या आहेत. दुसरा शनिवार आणि रविवार मिळून सुट्या चार दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येतात, असेही बोलले जात आहे. हे सर्व अधिकारी एकाचवेळी सुटी घेऊन नेमके गेले कुठे, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना चिंतेत टाकणारा ठरला आहे. ही बाब महापौरांनाही रुचली नाही. महापौर राखी कंचर्लावार यांनी आयुक्तांकडे पत्रातून नाराजी व्यक्त केल्याचे समजते. हे अधिकारी पावसाळी पर्यटनाला गेले असावे, असेही बोलले जात आहे.
या अधिकाऱ्यांनी ८ आणि ९ जुलैचा रजेचा अर्ज सादर केला आहे. १० जुलैला महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने शासकीय सुट्टी असते. रविवारी हक्काची सुट्टी आहे. असे सलग चार दिवस या अधिकाऱ्यांना रजा मिळणार आहे. एकाचवेळी, एकाच दिवशी आणि एकाच नमुन्यात सुट्टीचा अर्ज त्यांनी दिला. यावरून या सर्वांना सुट्टीचे काम पडले कसे, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. रजेवरील बहुतेक अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी आऊट ऑफ कव्हरेज आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या या सामूहिक सुट्टीने पदाधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक यांचे लग्न असल्याने तेही रजेवर गेले आहेत. परिणामी, मागील दाेन दिवसांपासून अवघी पालिका अधिकाऱ्यांविना आहे. नागरिकांच्या कामांचा खोळंबा झालेला आहे. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
बाॅक्स
सुट्टीवर गेलेले अधिकारी
मनपाचे आयुक्त राजेश माेहिते, उपआयुक्त विशाल वाघ, मुख्य लेखाधिकारी संताेष कंदेवार, मुख्य लेखा परीक्षक मनाेज गाेस्वामी, नगर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे आणि उपअभियंता विजय बाेरीकर हे प्रमुख अधिकारी सुट्ट्यांवर गेले आहेत.