कोरपना : तालुक्यातील बहुतांश समाज मंदिरांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्या उद्देशासाठी समाजमंदिर बांधण्यात आले, त्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. काही गावातील समाज मंदिराच्या खिडक्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे या समाज मंदिराकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
धूर फवारणी करण्याची मागणी
वरोरा: शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने डासांच्या बंदोबस्तासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
कापूस उत्पादकांच्या समस्या वाढल्या
कोरपना : जिल्ह्यातील काही तालुक्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, यंदा अवेळी पाऊस, बोंडअळीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळाली नाही. यातून गरीब शेतकरी बळी पडण्याची शक्यता आहे. यंदा किडीने कपाशीचे उत्पादन घटले आहे.
स्वच्छता मोहीम गतिमान करावी
गोंडपिपरी : शहरातील प्रत्येक वॉर्डात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. वाॅर्डातील चौकातही रस्त्यावर वाहने ठेवण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. परिणामी, स्वच्छता आणि पार्किंगचा प्रश्न नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
नळ योजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावात नळ योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावात नळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामीण नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. बंद असलेल्या नळ योजना प्रशासनाने सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
रिक्त पदांमुळे योजना पोहोचल्याच नाही
कोरपना : कृषी विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विविध पदे रिक्त असल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. सुधारित आकृतिबंधानुसार अनेक पदांना मंजुरी आहे, पण पदभरती झाली नाही. त्यामुळे योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अडचण जात आहे.
कोसा उत्पादकांना लोखंडी शिडी द्यावी
चंद्रपूर : भोई-ढिवर समाजाचा मासेमारीसोबतच कोसा (रेशीम) उत्पादनावर भर आहे. सावली, मूल, चिमूर, सिंदेवाही तालुक्यात कोसा उत्पादन घेतल्या जाते. झाडावरून कोसा तोडण्यासाठी लोखंडी शिडी शासनाने सदर उत्पादकांना द्यावी, अशी मागणी कोसा उत्पादकांनी केली आहे.
अपघातग्रस्तस्थळांवर फलक लावावे
गडचांदूर : जिल्ह्यातील अनेक अपघातप्रवणस्थळांवर फलक नसल्याने वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अपघात टाळण्यासाठी या स्थळांवर फलक लावण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. विशेषत: राजुरा, कोरपना तालुक्यातील रस्त्यावर फलक नसल्याने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
चंद्रपूर-वणी मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढवा
घुग्घुस : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही विविध मार्गाने दारू तस्करी सुरू आहे. पोलीस कारवाई करत आहे. परंतु, तस्करीच्या घटना वाढतच असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील काही मद्यपी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे जात आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
डासांचा उच्छाद वाढला
मूल : तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणामी, डासांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
कचरा ट्राॅली दुरुस्ती करावी
चंद्रपूर : शहरात दररोज सकाळी घंटागाडीद्वारे कचरा संकलन केल्या जात आहे. मात्र काही वाॅर्डातील घंटागाडींची दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा कचरा रस्त्यावर सांडत आहे. त्यामुळे स्वच्छतेचे तीनतेरा वाजत आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला कचरा ट्राॅली दुरुस्ती करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी आहे.