पिंपळगाव (भो) : पिंपळगाव (भो.) हे ब्रह्मपुरी तालुक्यातील सहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावासाठी असलेली जलवाहिनी संपूर्ण गावाची तहान भागविण्यात अपयशी ठरली आहे. नवीन जलवाहिनी होईपर्यंत नवीन नळ कनेक्शन देऊ नये, अशी मागणी जनतेने केली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील १३ गावांसाठी प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या टाक्या ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या. मात्र त्या यंत्रणेचा कारभार लवकरच संपुष्टात आला. पिंपळगाव भो. येथे पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता भलत्याच जागेवर उभारली गेल्याने फक्त अर्ध्या गावाला पाणीपुरवठा होतो. अगोदरच पाण्याच्या टाकीची साठवणूक क्षमता लोकसंखेच्या मानाने कमी पडते. ३० वर्षांपूर्वी जे पाइप टाकले गेले, ते निकृष्ट असल्याने बऱ्याच ठिकाणी चोकअप झाले, तर उरलेलेही त्याच मार्गावर आहे. अशा पाण्याच्या टाकीवरून नवीन नळ कनेक्शन देणे म्हणजे पाण्याची टंचाई निर्माण करण्यासारखे आहे. त्यामुळे नवीन जलवाहिनी झाल्याशिवाय नवीन नळ कनेक्शन देऊ नये, अशी मागणी पिंपळगाव येथील महिलांनी केली आहे.