केमटा येथील घटना : नातवाने वाचविले प्राणचंद्रपूर : शौचासाठी गेलेल्या कमटा येथील एका वृद्ध महिलेवर दोन बिबट्यांनी शुक्रवारी सायंकाळी हल्ला केला. त्यात ही महिला किरकोळ जखमी झाली असून तिच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिचे नातू घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बिबट्यांना पिटाळून लावले. तोपर्यंत बिबट्याने या महिलेल्या मानेवर पंजाने वार केला.अजयपूर येथून तीन किलोमीटर अंतरावरील केमटा येथील जानकी कवडू पेंदोर (८०) ही महिला शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गावनजीक शौचासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी त्या घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांना शंका येऊन त्यांचा मुलगा शिवदास पेंदोर, नातू प्रकाश पेंदोर यांच्यासह गावातील इतर ग्रामस्थ त्यांचा शोध घेण्यासाठी गावाबाहेर पडले. दोन गटांमध्ये विभागून त्यांनी जानकी पेंदोर यांचा शोध सुरू केला. या गावाजवळच वनविकास महामंडळाच्या अधिकार क्षेत्रातील जंगल आहे. या वनामध्ये वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. त्या जंगलातील दोन बिबट्यांनी जानकी पेंदोर यांच्या पाठीमागून येत हल्ला चढविला. त्यामुळे जानकी यांनी जिवाच्या आकांताने वाचविण्याचे आवाहन केले. हा आवाज ऐकून त्यांचे नातू प्रकाश पेंदोर व अभिषेक जुमनाके त्या दिशेने धावले. यावेळी प्रकाश पेंदोर व अभिषेक जुमनाके यांनी हातात झाडाच्या फांद्या घेऊन बिबट्यांकडे धाव घेतली. त्या दोघांनाही पाहून बिबट्यांनी पळ काढला. नातू वेळेवर घटनास्थळी पोहोचल्याने आजीचे यांचे प्राण वाचविण्यात यश आहे. (प्रतिनिधी)
दोन बिबट्यांच्या हल्ल्यातून वृद्धा बचावली
By admin | Published: April 17, 2017 12:37 AM