लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नागभीड तालुक्यात गुप्तधन शोधणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. कोथूळणा येथील हुनमान मंदिरात ही टोळी खोदकाम करीत असताना गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे टोळीतील इतर व्यक्ती पसार झाले. मात्र टोळीतील एका सदस्याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. राजेश किसन सावरकर रा.बंगाली कॅम्प चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.कोथूळणा येथील जुन्या हनुमान मंदिरात शुक्रवारी रात्री गुप्तधन शोधण्याच्या हेतूने पाच-सहा व्यक्तींची एक टोळी लोखंडी साहित्याने खोदकाम करीत होती. खोदकाम सुरू असताना होत असलेल्या आवाजाने गावातील काही व्यक्तींना जाग आली. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन बघितले असता मंदिरात कोणीतरी खोदकाम करीत असल्याचे दिसून आले. त्यांनी आणखी काही लोकांना जागे केले आणि मंदिराचे दिशेने धाव घेतली. कोणीतरी आपल्याकडे येत असल्याची चाहूल गुप्तधन शोधत असलेल्या टोळीला लागली आणि ते वाट मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळत सुटले. पळत असताना टोळीतील एक सदस्य एका खड्यात पडला. त्याला गावकऱ्यांनी पकडले. गावकऱ्यांनी तत्काळ याची पोलिसांना सूचना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले व आरोपीला ताब्यात घेतले. दादाजी काशिराम वंजारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी राजेश किसन सावरकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास नागभीड पोलिस करीत आहेत
जुन्या मंदिरांमध्ये खोदकाम करून गुप्तधन शोधणाऱ्या टोळीचा चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 2:17 PM
नागभीड तालुक्यात गुप्तधन शोधणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे.
ठळक मुद्देटोळीतील एक सदस्य पोलिसांच्या ताब्यात