घुग्घुस : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
दूरसंचार कार्यालयाची दुरुस्ती करावी
कोरपना : येथील बीएसएनएलच्या दूरभाष केंद्राची दुरावस्था झाली आहे. परिणामी या भागात झुडपांचे साम्राज्य आहे. येथील कार्यालय नावापुरतेच असून अधिकारी व कर्मचारीही नाही. त्यामुळे नागरिकांना राजुरा येथे जाऊन आपली कामे करावी लागते आहे. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी-देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे त्याचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. कोरोनामुळे सध्या रस्त्यावर कमी वाहतूक आहे.
गावांना रस्त्याची प्रतीक्षा
वरोरा : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागते. अनेक गावांत जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, याचा फटका नागरिकांना बसत आहे.
त्या रेल्वे मार्गाची गरज
बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. हा मार्ग तयार झाल्यास बल्लारपूर, गोंडपिपरी, आष्टी, आलापल्ली, अहेरी, सिरोंचा भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी सोयीचे होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.
सांडपाण्याने आरोग्य धोक्यात
सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देत नसल्याचा आरोप आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने स्वच्छता गरजेची आहे.
केरोसीनचा पिरवठा करावा
जिवती : केरोसीनचा पुरवठा करणे शासनाने आता बंद केले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळी दिव्याचा वापर करावा लागतो. मात्र, केरोसीन बंद झाल्याने अडचण जात आहे. केरोसीन पुरविण्याची मागणी आहे.
खैरगाव रस्त्याची निर्मिती करावी
कोरपना : शहरातील तलावापासून खैरगाव व शेतशिवाराकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे. रस्ता झाल्यास नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे.