चंद्रपूर : परिसरात प्रथमताच पृथ्वीवर कोट्यवधी वर्षां पुर्वी सर्वात आधी जन्माला आलेली स्ट्रोमॅटोलाईट्सची जिवाष्मे येथील विज्ञान अभ्यासक आणि जीवाश्म संशोधक प्रा. सुरेश चोपणे ह्यांना नुकतीच सापडली आहेत. जगात क्वचित आढळणारी ही सायनो बेक्टेरियाची जिवाष्मे दुर्मिळ आहेत. ही सर्व जिवाष्मे त्यांच्या व्यक्तीगत संग्रहालयात ठेवलेली आहेत.
पृथ्वीवर जवळ जवळ तीन अब्ज वर्षांपूर्वी सूक्ष्मजीव विकसित झाले. अजूनही त्यांचे अस्तित्व पृथ्वीवर आहे. चंद्रपुरचे भौगोलिक क्षेत्र हेसुद्धा खूप प्राचीन आहे. इथे 10 कोटी वर्षा दरम्यानचे जिवाष्मे आढळली आहेत. परंतु चंद्रपुर तालुक्यात 200 ते 150 कोटी वर्षाच्या निओ प्रोटेरोझोईक काळातील चुनखडकात ही जिवाष्मे प्रथमच चंद्रपुर शहराजवळ इरई नदीच्या परिसरातआढळली. पूर्वी येथे समुद्र होता आणि समुद्राच्या उथळ आणि उष्ण पाण्यात हे सूक्ष्मजीव विकसित झाले होते. पृथ्वीवर सर्वात आधी ह्याच सायनो बेक्टेरिया, अलजी जन्माला आलेल्या होत्या. त्यानंतर कोट्यावधी वर्षाने जलचर, उभयचर आणि जमीनीवर राहणाऱ्या जीवांचा विकास होत गेला.
चंद्रपुर आणि यवतमाळ जिल्ह्यात चांदा ग्रुपच्या बिल्लारी आणि पैनगंगा ग्रुपच्या चुनखडकात ह्या स्ट्रोमॅटोलाईट्स चे जिवाष्म आढळतात, ह्यांना शास्त्रीय दृष्टीने (कृकोकल्स ,ओस्कीटोरी इल्स) असे म्हटले जाते. ह्यातील अनेक प्रजाती उथळ समुद्रातील चिखलात खनिजावर जगत होत्या, त्या गोल गोल आकाराच्या समूहाने वाढत जात असे. पुढे हीच चिखल माती अश्म बनली परंतु त्याच्या प्रतिमा आजच्या चुनखडकावर स्पस्ट दिसतात. चंद्रपुर आणि विदर्भात कोट्यवधी वर्षांपासून ७ कोटी वर्षापर्यंत तेव्हा समुद्र होता, त्याच समुद्रात २०० ते १५० कोटी वर्षाच्या काळातील निओ प्रोटेरोझोईक काळात हे सुक्ष्मजीव विकसित झाले.चंद्रपुर जिल्ह्यातील सेल आणि चुनखडक तयार झाले आणि कोळसा तयार झाला. पुढे ६ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर प्रचंड ज्वालामुखी उद्रेक झाले आणि भूपृष्ठ वर आले आणि समुद्र दक्षिणेकडे सरकला. परंतु, ज्वालामुखी प्रवाहामुळे चंद्रपुर, महाराष्ट्र परिसरातील सर्व जीव मारले गेले, त्यात डायनोसॉर सारखे महाकाय जीव सुध्दा मारले गेले. आजही आपल्या परिसरात त्या सर्व जीवांचे जिवाष्मे आढळतात. प्रा. सुरेश चोपणे ह्यांना मिळालेल्या स्ट्रोमॅटोलाईट्सच्या जिवाष्मांमुळे, नवा जैविक इतिहास कळेल आणि संशोधकांना संशोधन करण्याची संधी मिळेल असे सुरेश चोपणे ह्यानी सांगितले.