कोरोनाची दुसरी लाट गंभीर होती. या काळात रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नव्हते. काहींना रुग्णालयाबाहेरच आपला जीव गमवावा लागला. रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेने ४५ खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. बसस्थानकाजवळील रेनबसेरा येथे ‘आसरा’ या नावाने कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. मनपाच्या या रुग्णालयात उत्तम आरोग्यसेवा मिळतील, अशी अपेक्षा चंद्रपूरकरांना होती. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली. मात्र यानंतर या रुग्णालयाचा वापर ओल्या पार्टीसाठी होऊ लागल्याचे मनपाच्या वर्तुळात व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून दिसून येते. उल्लेखनीय, रुग्णालयातील काही डॉक्टरांनी तेथे कर्तव्यावर असलेला सुरक्षारक्षक नको, अशी मनपा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. सध्या महानगरपालिका लेखा परीक्षणातील अनियमिततेवरून चांगलीच अडचणीत सापडली आहे. आता या व्हिडिओप्रकरणी कोणती भूमिका घेते, हे बघण्यासारखे आहे. एका जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकाराला दुजोरा दिला.
मनपाच्या आसरा रुग्णालयात ओली पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:20 AM