घनश्याम नवघडे
नागभीड : नागभीड - नागपूर या बहुप्रतिक्षित ब्राॅडगेज रेल्वे मार्गासाठी रेल्वेविभागाकडून जुलै महिन्यात दुसऱ्यांदा निविदा मागविण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या रेल्वे मार्गाचे काम त्वरित मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र नुकत्याच पार पडलेला अर्थसंकल्पात या व अन्य तीन रेल्वे मार्गासाठी केवळ २८५ कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आल्याने या मार्गाची गती मंदावणार, अशी चिन्ह आहेत.
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना १०६ किमी लांबीच्या या नॅरोगेज मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली होती. पण त्यानंतर प्रत्येक वेळेस या रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात तरतूदच करण्यात येत नव्हती. दरम्यान, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि या मार्गाविषयी या भागातील लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. या लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी २०१४ मध्ये निवडून आल्यावर काही दिवसातच नागभीड येथे रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या मार्गातील अडचणी दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळेही या अपेक्षेत आणखीच भर पडली होती. मात्र या मार्गासाठी कोणतीही तरतूद होत नसल्याने लोकांच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जात आहे. या मार्गास ७०८ कोटी ११ लाख रुपये खर्च असून यातील निम्मा वाटा राज्य सरकार उचलणार आहे.
गाडीही बंद
हा नँरोगेज मार्ग सुरू असताना या मार्गावरून गाड्यांचे चार टायमिंग सुरू होते. पण त्वरित काम सुरू करण्याच्या नावाखाली २५ नोव्हेंबर २०१९ रोजी संपूर्ण टायमिंग बंद करण्यात आले. या बाबीस आता सव्वा वर्षाचा कालावधी होत आहे आहे. मात्र कामाची गती अतिशय मंद आहे.या गाड्यांनी चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील हजारो प्रवासी रोज प्रवास करायचे.मात्र आता या गाड्याच बंद असल्याने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
एकमेव मार्ग
मध्य रेल्वे विभागात जे काही रेल्वे मार्ग आहेत, त्या सर्व रेल्वे मार्गांचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाले आहे. केवळ नागभीड - नागपूर हाच एकमेव मार्ग नॅरोगेज उरलेला होता.
बॉक्स
ब्राडगेज झाल्यास मोठा फायदा
१०६ कि.मी. लांबीच्या या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा, कुरखेडा ,आरमोरी, गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातील पवनी व लाखांदूर या तालुक्यांना नागपूरसाठी अतिशय सोयीचा मार्ग ठरू शकतो. एवढेच नाही तर या भागातील कृषी उत्पादनासाठी या मार्गाच्या रूपाने नागपूरसारखी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. नागपूरवरून दक्षिणेकडे जाणाऱ्या व दक्षिणेकडून नागपूरला येणाऱ्या वर्धाऐवजी हा मार्ग सोयीस्कर ठरणार आहे.
कोट
या रेल्वे मार्गासाठी करण्यात आलेली अतिशय अल्प तरतूद लक्षात घेता हा मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. पुरवणी अर्थसंकल्पात या मार्गासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
- संजय गजपुरे, जि.प. व सल्लागार सदस्य झोन रेल्वे कमिटी