मनपाची दिरंगाई : अपहरणाची शंका मृत्यूत परावर्तितलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : या शहराला स्वच्छतेचा राज्यातून सहावा आणि विदर्भातून पहिला क्रमांक मिळाला आहे. या शहरात सर्वत्र उघड्या नाल्या असताना स्वच्छतेची पाहणी करणाऱ्या चमूने काय पाहिले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्थानिक जलनगर परिसरातील दीड वर्षीय बालिकेचा नालीमध्ये बळी गेला आहे. ही बालिका सोमवारी सायंकाळी ७ वाजता नालीत पडली होती. तिचा मृतदेह मंगळवारी सापडला. तोपर्यंत तिचे अपहरण झाल्याची शंका व्यक्त केली जात होती.जलनगरमध्ये मरण पावलेल्या बालिकेचे नाव सहाना शेख आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहाना शेखची आई सोमवारी सायंकाळी ७ वाजता घरीच नमाज पठन करीत होती. त्यावेळी सहाना खेळत-खेळत घराच्या बाहेर गेली. दीड वर्षे वय असल्याने तिला नाली आणि दुसरे काही समजणे शक्य नव्हते. ती खेळतखेळत घरासमोरील नालीमध्ये पडली. नमाज पठन झाल्यानंतर तिच्या आईला सहाना घरी दिसली नाही. त्यामुळे तिच्या आईने घराशेजारी तिचा शोध घेतला. मात्र सहानाचा काही पत्ता लागला नाही. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. त्यामध्ये अपहरण करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी शहरात नाकाबंदी करुन करुन तपास सुरु केला. दरम्यान पोलिसांनी घराशेजारची पाहणी केली असता, शेजारच्या नालीमध्ये बालिकेचा प्रेत आढळून आले.घंटागाड्या आहेत, पण नाल्यांचे काय?शहर स्वच्छ दिसावे, यासाठी मनपाचे आयुक्त संजय काकडे यांनी युद्धस्तरावर स्वच्छता मोहीम राबविली आहे. उघड्यावर शौचासाठी गेलेल्या व्यक्तीला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला. त्याची रक्कम तब्बल ३५ हजार रुपये आहे. कचरा उचलणे महत्त्वाचे आहे, यात वादच नाही. परंतु शहराच्या अनेक भागात नाल्या उघड्याच आहेत. त्या तुंबलेल्या असतात. त्या दररोज स्वच्छ केल्या जाव्या, यासाठी कोणतीही यंत्रणा राबताना दिसत नाही. जलनगर, नगिनाबाग, स्वावलंबीनगर, बाबुपेठ अशा गोरगरीब नागरिकांच्या परिसरात नाल्या उघड्या आहेत. स्वावलंबी नगर, समतानगर आदी भागात अनेकांच्या घरासमोर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात तेथेही खड्डे असतात. वाहन चालविणे कठीण असते.तुबंलेली नाली ठरली घातकभाजपा सरकारकडून गाव स्वच्छ मोहिम मोठ्या जोमात राबविण्यात येत असली. तर शहरातील अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. जलनगर येथील नाल्यासुद्धा तुंबलेल्या आहेत. मात्र नाल्याचा अजुनही उपसा करण्यात आला नाही. त्या नालीत पडल्यामुळे सहानाला आपला जीव गमवावा लागला. अपहरणाची शंकाजलनगर येथील दीड वर्षीय बालिकेच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदविल्यानंतर त्या बालिकेचे अपहरण झाले, असा मॅसेज सोशल मीडियावर पसरला होता. अनेकांना या बालिकेचे अपहरण करण्यात आल्याची शंका आली. त्यामुळे पोलिसांनी चारही बाजूला नाकाबंदी करुन कामाला लागले. त्यांनी शहराच्या गल्लीबोळात तपास सुरु केला होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकसुद्धा बालिकेचा शोध घेऊ लागले. दरम्यान घराजवळ नालीमध्ये बालिकेचे प्रेत आढळून आले.बालिकेच्या मृत्यूनंतर मनपाची स्वच्छता सभाजलनगरात सोमवारी सायंकाळी दीड वर्षाच्या बालिकेचा नालीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर चंद्रपूर महानगर पालिकेच्या तूनत स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी मंगळवारी नाले सफाईवर सभा घेतली. मान्सूनपूर्व नाले सफाई करण्याबाबत सभापती पावडे यांनी कर्मचाऱ्यांना तंबी दिली. स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही पावडे यावेळी म्हणाले. स्वच्छतेमध्ये विदर्भात प्रथम असलेल्या चंद्रपूरला देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी ‘स्वच्छ-सुंदर चंद्रपूर’ बनविण्याचा संकल्प घेण्यात आला. स्वच्छतेसाठी मनुष्यबळ कमी पडल्यास त्याची तातडीने पूर्तता केली जाईल, असेही पावडे यांनी सांगितले.
दीड वर्षीय बालिकेचा नालीत बळी
By admin | Published: May 10, 2017 12:40 AM