चंद्रपूर : पाकिस्तान येथे जावून दहशतवाद्यांचा सूत्रधार असलेल्या हफिज सईद याची वेदप्रकाश वैदिक यांनी भेट घेतली. यावरुन सध्या देशात व संसदेत वादंग माजले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संंघ, भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे. परंतु तेही सदिच्छा भेट असल्याचे म्हणत पाठराखण करीत आहे. या घटनेचा चंद्रपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील युवक काँग्रेसच्या वतीने उपोषण करून निषेध केला. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी सरकार व वेदप्रकाश वैदिक याचा निषेध नोंदवयासाठी १८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेपासून ते १९ जुलै रोजी सकाळी १०.३० पर्यंत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषण आंदोलनाचे नेतृत्त्व चंद्रपूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन कत्याल यांनी केले. त्यांच्यासोबत लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव राजेश अडूर, विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव अनिल सुरपाम, महासचिव अनिल नरुले व सतीश बाबरे उपोषणाला बसले होते.१९ जुलैला दुपारी १२ वाजता माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांना लिंंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणकर्त्यांनी निवेदन सादर केले. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव कुणाल राऊत, चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्र अध्यक्ष शिवा राव, चंद्रपूर लोकसभा उपाध्यक्ष सम्राट खांडरे, कुणाल चहारे, नगरसेवक नागापुरे, प्रवीण पडवेकर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
युवक कांँग्रेसच्या वतीने आयोजित एक दिवसीय उपोषणाची सांगता
By admin | Published: July 19, 2014 11:51 PM