चिमूर :
सध्या वातावरणात गारवा असल्याने अनेकांना हुडहुडी भरली आहे. या बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक नागरिक शेकोटीचा आधार घेतात. अशाच एका शेकोटीने एकाचा घात केला. शेकोटीची आग घराला लागली आणि वृध्दाचा यात होरपळून मृत्यू झाला. ही घटना सिरपूर येथे रविवारी मध्यरात्री १२ वाजतादरम्यान घडली.
दादाजी नारायण आदे (६५) असे मृताचे नाव आहे. सिरपूर येथील दादाजी आदे यांची शिवनपायली मार्गावर एक झोटीशी झोपडी असून त्याच्या घरी कोणीही नसल्यामुळे त्या झोपडीत ते एकटेच राहायचे. सध्या गारव्याचा मोसम असल्यामुळे त्यांनी झोपडीतच शेकोटी पेटविली होती आणि आग शेकत बसले होते. असा त्यांचा नेहमीचाच नित्यक्रम होता. परंतु रविवारी मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान अचानक झोपडीला आग लागली. या आगीत संपूर्ण झोपडी आगीच्या कवेत आली आणि दादाजी आदे गाढ झोपेत असल्याने त्यांना आगीचा अंदाज आला नाही. आगीमुळे झोपडीवरील सर्व टिनाची पत्री खाली कोसळली आणि त्यात दादाजी दबले गेले. तिथेच अंथरूण, पांघरुणासोबतच दादाजी जळाले. घटनेची माहिती गावकऱ्यांना होईपर्यंत झोपडी जळून खाक झाली होती. या घटनेची माहिती भ्रमणध्वनीवरून पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली.