ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : समोरून येणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ब्रम्हपुरी-वडसा महामार्गावर घडली.
शिवा योगेश देसाई (१८) रा. देसाईगंज (वडसा) असे मृतकाचे तर महेश दयाराम आंबोने (२८) रा. सोंदरी असे जखमीचे नाव आहे. सध्या शेतातील रब्बी माल मळणीचा हंगाम परिसरात सुरू आहे. पिंपळगाव येथील ट्रॅक्टर मळणी यंत्र घेऊन ट्रॅक्टरचालक राजू श्रीराम धांडे (३१) हा चिखलगांव येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी मालाची मळणी करून पिंपळगाव येथील स्वगावी ट्रॅक्टरने सोंदरी-सुरबोडी मार्गाने येत होता. तर विरुद्ध दिशेने सोंदरीवरून महेश आंबोने व शिवा देसाई हे दोघे वडसाकडे जात होते.
दरम्यान, सुरबोडी-सोंदरी मार्गावर दुचाकी व ट्रॅक्टरची जबर धडक झाली. या अपघातात शिवा देसाई जागीच ठार झाला तर महेश आंबोने पाय तुटल्याने गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण पिसे करत आहेत.