बल्लारपूर : बामणी परिसरातील मोन्टफोर्टजवळील राष्ट्रीय महामार्गावर ऑटो व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात नवी दहेलीच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. इतर चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. परंतु सायंकाळी ६ वाजता पोलिसांना याबाबत माहिती मिळाली, हे विशेष.
गुरुवारी दुपारी प्रदीप खेरकर (२३) हा ऑटोमध्ये (क्रमांक एम.एच. ३४ डी. ४८४३) दोन प्रवासी घेऊन नवी दहेलीला जात होता. परंतु दहेली गावाजवळ ऑटो अनियंत्रित झाल्यामुळे पलटी होऊन दूरवर घासत गेला. तर त्याच्या विरुद्ध दिशेने येणारी मोटारसायकल (क्रमांक एमएच ३४ एझेड ८६१०) ऑटोवर आदळली. यात पाच जण जखमी झाले. सर्वांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. त्यानंतर त्यांना चंद्रपूर शासकीय रुग्णालयात रेफर केले. मात्र प्रतीक बक्षी (२५) रा. दहेली याचा मृत्यू झाला तर मोटारसायकलस्वार गौरव रंगारी (३६) रा. रायपूर व जाम तुकूम येथील रवींद्र मानकर (२३) हे गंभीर जखमी झाले. याशिवाय ऑटोचालक प्रदीप खेरकर रा. नवी दहेली व साहिल आत्राम (३०) हे देखील जखमी झाले.
090721\aoto.jpg
अपघातात चेंदामेंदा झालेला ऑटो