चंद्रपूर : कोरोनामुळे शिक्षण बंद आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात मोठ्या अडचणी भासत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने चिमूर येथे ‘एक दिवसीय शाळा भरली’ हा आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांना शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले.
कोरोनामुळे अंगणवाडी ते महाविद्यालये सर्वच बंद आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणात बऱ्याच अडचणी दिसून येत आहेत. काहींकडे मोबाइलच नाही, तर काही भागांत नेटवर्कची समस्या आ वासून उभी आहे. परिणामी ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणही प्रभावी पद्धतीने शक्य नाही. जर असेच पुढे सुरू राहिल्यास भविष्यात मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्ष ॲड. मेघा रामगुंडे यांनी ‘एकदिवशीय शाळा भरली’ हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल, पेन, आदी साहित्य भेट देण्यात आले. यावेळी शिक्षिका दुर्गा संदीप रामगुंडे, अंगणवाडी सेविका लता शंभरकर, अंगणवाडी मदतनीस मालाताई आदींची उपस्थिती होती.