पोंभूर्णा : तालुक्याचे शेवटचे टोक असलेले गंगापूर व गंगापूर टोक ही दोन गावे दोन नद्यांच्या मधात वसलेली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरेअंतर्गत या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी फक्त डोंग्याचा वापर करावा लागतो. पावसाळ्यात दुथडी भरून वाहत जाणारी नदी प्रचंड रौद्ररूप धारण करून असते. असे असताना आरोग्य विभागाने जीव धोक्यात घालून डोंग्याने नदी ओलांडत या गावातील नागरिकांचे १०० टक्के कोविड लसीकरण केले.
पोंभुर्णा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी गंगापूर गावात १०० लसीकरणाची मोहीम हाती घेतली. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चेक ठाणेवासना येथून साध्या डोंग्याचा वापर करून गंगापूर गावात दाखल झाले. गावात आशा वर्कर व सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ३० ऑगस्टला कोव्हिशिल्ड लसीकरण सत्र आयोजित केले. गंगापूरची लोकसंख्या ३४० च्या आसपास आहे. लसीकरणासाठी पात्र असलेल्या १३६ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घेतल्याने शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले.
गावात लसीकरणासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, तालुका सुपरवायझर सूरज डुकरे, आरोग्य सहायक गजानन मेश्राम, आरोग्य सेवक सत्यनारायण सकनेरपवार, आरोग्य सेविका आयशा मडावी, आरोग्य सेविका प्रियंका वाघमारे, आशा वर्कर पुष्पा डायले, वाहन चालक पराग चांदेकर, वाहनचालक पवन कोवे, डाटा एन्ट्री आपरेटर चिंटू कावलवार यांनी परिश्रम घेतले.
जीवघेणी नदी, तरीही दिली आरोग्य सेवा
१९ ऑगस्टला काही पाहुणे गंगापूर गावात जाण्यासाठी नदीतून डोंग्याने प्रवास करीत होते. अचानक पाण्याची पातळी वाढली व डोंगा पाण्यात बुडाला. यात एकाचा मृत्यू झाला व दोघे पोहता येत असल्याने बचावले. पावसाळ्यातील ही भीषणता आहे. तरीही आरोग्य यंत्रणेने गंगापूर गावात आरोग्य सेवा दिली.
कोट
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी नदीतून डोंग्याने प्रवास करीत कर्तव्य बजावले. गंगापूरसारख्या दुर्गम गावात शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले. अधिकारी व कर्मचारी हे अभिनंदनास पात्र आहे.
- गंगाधर मडावी, सदस्य पंचायत समिती पोंभुर्णा.
.
310821\img-20210830-wa0096.jpg
कोरोना लसिकरणासाठी गंगापूर गावात जाण्यासाठी डोंग्यातून प्रवास करतांना आरोग्य अधिकारी व कर्मचारी