लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विषाणूंशी लढ्यासाठी शरीरातील प्रतिकारशक्ती प्रभावी असावी लागते. अन्यथा अशा व्यक्तींना संसर्गाचा धोका जास्त असतो. कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अहवालानुसार, मंगळवारपर्यंत जिल्ह्यात एक लाख ५४ हजार ६६९ व्यक्ती अति जोखमीच्या संपर्कात (हाय रिस्क) आहेत. त्यामध्ये चंद्रपुरातील ६० हजार ८७३ जणांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करणे आणि निकषात बसणाऱ्या व्यक्तींनी तातडीने लस घेणे हाच पर्याय नागरिकांच्या हातात असल्याचे सध्याचे चित्र आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने केले जात आहे. शिवाय, संसर्ग झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावे, यासाठी चार कोविड केअर सेंटर, पाच खासगी डीसीएचसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर, ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरी येथेही अद्ययावत आरोग्य सुविधा निर्माण करण्यात आल्या. मात्र, बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतानाच दिसत आहे. मंगळवारपर्यंत रूग्णांची एकूण संख्या २४ हजार ९६४ वर पोहोचली आहे. कोरोना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अहवालानुसार, जिल्ह्यात १५ हजार १५ आणि चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत नऊ हजार ८२८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात ९३ हजार ७९७ तर चंद्रपुरात ६० हजार ८७३ जण हाय रिस्क म्हणजे अति जोखमीच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे हाय रिस्क श्रेणीतील व्यक्तींना यापुढे आरोग्याबाबत खबरदारी पाळावी लागणार आहे.
३ लाख ९७ हजार ८७६ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जिल्ह्यात बुधवारपर्यंत ३ लाख ९७ हजार ८७६ जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले. यामध्ये ग्रामीण भागातून २ लाख १९ हजार ९९१ तर चंद्रपूर मनपा क्षेत्रातून एक लाख ७७ हजार ६८५ जणांचा समावेश आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची व्याप्ती वाढविल्यास रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते.
जण अजूनही गृह विलगीकरणात आतापर्यंत ५२ हजार ७०१ ग्रामीण, २३ हजार २०८ शहरी व चंद्रपूर मनपा क्षेत्रात एक लाख ६९ हजार १२६ असे एकूण २ लाख ४५ हजार ३५ जण गृहविलगीकरणात होते. मंगळवारपर्यंत यातील २ लाख ४१ हजार २१७ जणांचे गृहविलगीकरण पूर्ण झाले. गुरूवारच्या माहितीनुसार ४ हजार ९७७ व्यक्ती अजूनही गृह विलगीकरणात आहेत.
२ लाख १८ हजार १६४ जण लो रिस्क जिल्ह्यातून एक लाख ११ हजार १८० व चंद्रपूर मनपा क्षेत्रातून एक लाख ६९ हजार ८४ व्यक्ती लो रिस्क म्हणजे कमी जोखमीच्या संपर्कात आहेत. मात्र, सध्याच्या कोरोना संसर्गाची स्थिती बघता आरोग्याबाबत निष्काळजीपणा केल्यास उद्रेकाची शक्यता नाकारता येत नाही.