लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : औषधांची विक्री नियमाप्रमाणे होते की नाही, हे तपासण्याच्या अनुषंगाने अन्न व औषधी प्रशासन विभाग, चंद्रपूरच्या वतीने एप्रिल २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील अनेक औषधी दुकानांची तपासणी करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आल्याने एका औषधी दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला. तसेच स्टॉक व विक्रीत तफावत तसेच अन्य कारणांसाठी ११ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले. ही कारवाई औषधी निरीक्षकांच्या तपासणीअंती सहायक आयुक्त (औषधी) मनीष चौधरी यांनी केली.
औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९४५अंतर्गत औषध विक्री व साठवणूक यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना मेडिकल स्टोअर्स चालकांना देण्यात आल्या आहेत. परंतु अनेकदा औषध विक्रेते नियम व कायद्याचे पालन न करता मनमर्जीने औषधांची विक्री करीत असतात. तसेच ग्राहकांना बिल न देणे, स्टॉक बूकवर नोंदी न घेणे, प्रतिजैविक औषधांचे बिल न देणे तसेच अन्य गैरप्रकार करताना दिसून येतात. यामुळे ग्राहकांचे तसेच शासनाचे नुकसान होत असते, शिवाय डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे विकल्यास त्याचे गंभीर परिणाम रुग्णांना भोगावे लागण्याची शक्यता असते. यावर आळा घालण्यासाठी सहायक आयुक्त (औषधी) मनीष चौधरी यांनी निरीक्षकांतर्फे कारवाईचा बडगा उगारला आहे.
अल्प कर्मचाऱ्यांतही कारवाई चंद्रपूर अन्न व औषध प्रशासनामध्ये निरीक्षकापासून अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कारवाई करण्यात मोठी अडचण जात आहे. तरीही औषधालयाची तपासणी करण्यात येत असून, दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे.
विक्रेत्यांनी या बाबींची घ्यावी काळजी नोंदणीकृत फार्मासिस्ट दुकानात बसावा. स्वतःच्या देखरेखीत औषधांची विक्री करावी. झोपेच्या गोळ्या व अन्य गंभीर आजारांवरील औषधी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शना- शिवाय विक्री करू नये. औषधांची विक्री व स्टॉकची माहिती अद्ययावत ठेवावी. व्हेटर्नरी औषधांची साठवणूक लेबलसह करावी.
"आमच्या विभागातर्फे नियमितपणे औषधालयाची तपासणी केली जाते. त्यामुळे औषध विक्रेत्यांनी नियम व कायद्याचे पालन करीत औषधांची विक्री करावी. मागील सहा ते सात महिन्यात मेडिकल स्टोअर्स चालकांनी हयगय केल्याने तसेच औषधी निरीक्षकांच्या तपासणीत दोष आढळून आल्याने एकाचा परवाना रद्द केला, तर ११ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले."- मनीष चौधरी, सहायक आयुक्त (औषधी), चंद्रपूर