चिमूर (चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात आकाशातून पडलेले सिलिंडर सापडणे सुरूच आहे. आतापर्यंत पाच सिलिंडर सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यात सापडले. त्यातच आता सहाव्या सिलिंडरसदृश गोलाकार अवशेषाची भर पडली आहे.
सहावे गोलाकार सिलिंडर चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या खडसंगी बफर झोनमधील तळोधी (नाईक) बिटातील कक्ष क्रमांक ४५ मधील वन तलावाच्या काठावर आढळून आले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.
खडसंगी बफरझोन क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे कर्मचाऱ्यांसह जंगलात पेट्रोलिंग करीत असताना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारस तळोधी बिटातील कक्ष क्रमांक ४५ मधील वनतलावाच्या काठावर एक गोलाकार वस्तू आढळून आली. या वस्तूचा पंचनामा करण्यात आला. याला तारासारखे आवरण असून, हा गोलाकार अवशेष वजनाने हलका आहे.
प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार या गोलाकार अवशेषाची माहिती चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगडे यांना दिली असता ते कर्मचाऱ्यांसह तातडीने अवशेष असलेल्या ठिकाणी पोहोचले. हा गोलाकार अवशेष सांगडे यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.