भा.ई. नगराळे : चंद्रपूर येथील कार्यक्रमात सत्कारचंद्रपूर : जिल्ह्यात स्काऊट-गाईड स्वयंसेवकांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक शाळा १०० टक्के स्काऊंट-गाईडमय करण्यात यावी, असे आवाहन स्काऊट गाईडचे मुख्य राष्ट्रीय आयुक्त आणि निवृत्त आयएएस अधिकारी भा. ई. नगराळे यांनी केले. नगराळे यांनी चंद्रपूर भारत स्काऊटस आणि गाईडस् कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या समवेत व्ही. एस. काळे, राज्य मुख्यालय आयुक्त (स्काऊट) आर. आर. जयस्वाल व राज्य सहसचिटणीस सारिका बांगडकर उपस्थित होते. यावेळी त्यांचा जिल्हाध्यक्ष सुरेश महाकुलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यानिमित्त व्ही. एस. काळे, आर. आर. जयस्वाल व सारिका बांगडकर यांचाही सत्कार करण्यात आला. नगराळे यांनी मुंबई येथील राज्य कार्यालयाच्या ‘व्हीजन २०२४’ या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यानेही ५ किंवा १० वर्षांसाठीचे ‘व्हीजन डॉक्युमेंट’ तयार करण्याचे आवाहन केले. जिल्हा संस्था इमारत दुरुस्ती करणे या महत्वाच्या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर भेटीवेळी कार्यालयाची इमारत नवीन व सुंदर असेल, अशी अपेक्षा त्यांनी केली.नगराळे यांनी चंद्रपूर जिल्ह्याला स्काऊट- गाईड, कब-बुलबुल यांना राष्ट्रपती भवन व राजभवन येथे पुरस्कार स्वीकारण्याकरिता विशेष कोटा उपलब्ध करुन देण्याबाबतही आश्वासन दिले. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी प्रत्येक स्काऊटर- गाईडरांच्या प्रश्नाचे निरासन केले. यानंतर जिल्हा संस्था अध्यक्ष सुरेश महाकुलकर यांनी अध्यक्षीय भाषणात राज्य कार्यालय व राष्ट्रीय कार्यालयाच्या प्रगतीसाठी आणि यशस्वीतेसाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे जिल्हा चिटणीस संचालन विजयराव टोंगे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा मुख्य आयुक्त लक्ष्मणराव धोबे, यशवंत हजारे , नीता आगलावे, खानझोडे, किशोर कानकाटे, के. एस. मनगटे, प्राचार्य कालिदास रामटेके, प्राचार्य शांताराम उईके, अल्का खापणे, अल्का ठाकरे, ललिता बेहरम, गाईडर प्रशांत खुसपुरे, विजय वैद्य, व्ही. एस. आदेवार, राजू बलकी, सेविका सोनकुसरे आदी उपस्थित होते. किशोर उईके यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्पित कडू, अमोल भगत, वसंता विहिरघरे व अरुणा ठाकरे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
प्रत्येक तालुक्यातील एक शाळा स्काऊट-गाईडमय व्हावी!
By admin | Published: February 15, 2017 12:47 AM