लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चंद्रपूर मनपाकडे प्राप्त अर्जापैकी एक हजार ५९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून सुमारे ३०४ घरकुलांचे बांधकामे सुरू आहेत. या योजनेंतर्गत अनेकांचे घरकुलाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे.महानगरपालिका स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आढावा महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहूल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.पंतप्रधान आवास योजनेतील घटक चार अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदानासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो लाभार्थ्यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे अर्ज सादर केले. यातील एक हजार ५० अर्ज मंजूर करण्यात आले आहेत तर ३०४ घरकुलांचे बांधकाम सुरू आहे.उर्वरित अर्जाच्या पडताळणीनंतर मालकी हक्काची कागदपत्रे, जमिनीचा स्थळ दर्शक नकाशा, कर पावती, स्टॅम्प पेपर या आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अर्जधारकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.सर्वांसाठी घरे २०२२ या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असावे, यासाठी केंद्र सरकारमार्फत महत्त्वाकांक्षी अशी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेस गती देण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांच्या प्रत्यक्ष घरी जावून पालिका कर्मचाऱ्यांनी यापूर्वी काम केले आहे. शासनातर्फे मंजूर योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळावा यासाठी अनेकदा कार्यशाळेचेही आयोजन केले आहे. या योजनेंतर्गत घरकुलासाठी केंद्र सरकारकडून एक लाख ५० हजार रुपये, राज्य शासनाकडून एक लाख रुपये असे एकूण दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.निरीक्षणानंतरच मिळणार अनुदानमागील काही वर्षांमध्ये चंद्रपूरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र यातील अनेकांनी घरसुद्धा नाही. त्यामुळे प्रत्येकांना घर असावे यासाठी ही योजना आहे. मंजुर झालेल्या घराचा नकाशा काढणे, तसेच बांधकाम मंजुरीसाठी कुठलाही खर्च लाभार्थ्यांना करावयाचा नसून पूर्ण सुविधा पालिकेतर्फे पुरविण्यात येत आहे. घरकुल बांधकामाच्या चार टप्प्यानुसार पायवा, स्लॅब लेवल, स्लॅब पूर्ण व घर फिनिशिंग यांचे निरीक्षण केल्यानंतर अनुदान देण्यात येणार आहे.
एक हजार ५९ घरकूल मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 6:00 AM
मनपा स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहूल पावडे, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त गजानन बोकडे, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, यांच्यासह मनपा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ठळक मुद्दे३०४ बांधकाम सुरू : महानगरपालिकेने घेतला पंतप्रधान आवास योजनेचा आढावा