चंद्रपूर : प्राचीन ऐतिहासिक कला, संस्कृती, गडकिल्ले व पर्यावरण संवर्धनासोबतच पर्यटनपूरक रोजगारासाठी राज्यातील १ हजार युवक-युवतींना ‘टुरिस्ट गाइड’ होण्याची संधी केंद्र व राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने उपलब्ध करून दिली. यासाठी ऑनलाईन मोफत प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून प्रमाणित पर्यटन मार्गदर्शक म्हणून प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे हा उपक्रम एकूणच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी देणार, असा दावा पर्यटन विभागाने केला आहे.
शहरी व मध्यमवर्गीयांच्या आनंदासाठी पर्यटन क्षेत्रात पायाभूत विकासकामे करण्याकडे सरकारचा कल असतो. बहुतांश पर्यटनस्थळे ग्रामीण व आदिवासी भागातच असताना रोजगार निर्मितीसंदर्भात मात्र सरकारची झेप आश्वासनापलीकडे जात नाही. त्यामुळे नैसर्गिक व सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या परंतु उपेक्षित पर्यटन स्थळांच्या परिसरातील तरुणाईला बेरोजगारीचे चटके बसत आहेत. त्यावर पर्याय म्हणून केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला ऑनलाइन आयआटीएफ टुरिझम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन कार्यक्रम तयार करण्यात आला. या कार्यक्रमतंर्गत राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून एक हजार युवक-युवतींना प्रमाणित पर्यटन मार्गदर्शक (टुरिस्ट गाइड) ऑनलाईन मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी राज्य पर्यटन विभागाने एक संकेतस्थळही तयार केले आहे.
सवडीनुसार घेता येईल प्रशिक्षण
टुरिस्ट गाइड प्रशिक्षणासाठी १८ ते ४० वयोगटाला प्रवेश देण्यात येणार आहे. याकरिता किमान बारावी उत्तीर्ण अट ठेवण्यात आली. ऑनलाइन डिजिटल मोफत प्रशिक्षण उमेदवार ज्या भागात अथवा गावात राहील तिथूनच सवडीनुसार घेता येणार आहे.
कोट
राज्य सरकारकडून पर्यटन प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रमाणपत्रधारकांना राज्यपातळी किंवा राज्यभरातील कोणत्याही पर्यटनस्थळांमध्ये टुरिस्ट गाइड म्हणून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.
- डॉ. धनंजय सावळकर, संचालक पर्यटन विभाग, महाराष्ट्र राज्य