न्यायालयाचा दणका : ब्रह्मपुरी तालुक्यातील घटनाचंद्रपूर : साखरपुडा झाल्यानंतर हुंड्यासाठी तगादा लावून लग्नाची तारिख काढण्यास नकार देणाऱ्या आरोपीला चंद्रपूरच्या प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. जगदीश हरीजी बढोले (३७) रा. नवेगाव बांध ता. अर्जूनी मोर जि. गोंदिया असे आरोपी नाव आहे.ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अऱ्हेर नवरगाव येथील महिलेचे लग्न नवेगाव बांध येथील जगदीश हरीजी बडोले याच्या सोबत जुडले. २७ नोव्हेंबर २०११ रोजी रितीरिवाजाप्रमाणे साखरपुडा झाला. त्यानंतर महिलेचे नातेवाईक लग्नाची तारीख काढण्याकरीता नवेगाव बांध येथे घरी गेले. त्यावेळी त्यांना लग्नाच्या तारखेकरीता अऱ्हेर नवरगाव येथे येत असल्याचे सांगून १५ एप्रिल २०१२ रोजी नातेवाईकासह आला. त्यानंतर त्याने लग्न करावयाचे असेल तर हुंडा म्हणून ५० हजार रुपये नगदी व १५ ग्रॅम सोन्याची चैनची मागणी केली. मागणी पुर्ण झाली तरच लग्नाची तारीख काढू असे सांगून निघून गेला. मुलीच्या वडीलांनी वारंवार विनंती करुन सुद्धा जगदीश बडोले हुंड्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय लग्नाची तारीख काढायला तयार नव्हता. त्यामुळे २६ जानेवारी २०१२ रोजी या प्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मुलीच्या तिच्या तक्रारीवरुन कलम ४ हुंडा प्रतिबंधक कायदा अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास भुपेंद्र पांडूरंग लेनगुरे यांनी करुन आरोपीस अटक केली. गुन्ह्याचे दोषारोपपत्र सहायक फौजदार रामभाऊ शहाणे यांनी न्यायालयात सादर केले. या गुन्ह्यात न्यायालयाने एकूण ८ साक्षदार तपासले. सर्व साक्षदारांनी फिर्यादीच्या बाजूने साक्ष नोंदविली. साक्ष पुराव्यावरुन प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाारी के. के. चाफले यांनी आरोपी जगदीश बडोले याला एक वर्षे कारावास व रुपये १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता अॅड. रणदिवे यांनी काम पाहिले. (स्थानिक प्रतिनिधी)
हुंडा मागणाऱ्यास एक वर्षाचा कारावास
By admin | Published: September 26, 2015 12:59 AM