गौरव स्वामी
वरोरा : कोरोना लॉकडाउनच्या काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे हे सर्व शिक्षकांसमोर एक प्रकारे आव्हानच आहे. त्यातही दृष्टीहीन बाधितांसाठी व्हर्च्युअल संवाद साधणे म्हणजे तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. व्हिडिओ पाहता जरी येत नसले तरी कानाने श्रवण करून काही निरनिराळी कौशल्य आत्मसात करून जीवन कौशल्यविषयक माहिती देण्याचा प्रयत्न वरोरा येथील अंध विद्यालय आनंदवन येथे निरंतर केला जात आहे.
काही दृष्टीहीन अंशतः अंध असलेले माजी विद्यार्थीसुद्धा आपापल्या परीने वेगवेगळ्या ग्रामीण भागातून जॉईन होऊन ऑनलाईन क्लासचा पहिल्यांदाच अनुभव घेत आहेत. सध्या कोरोना स्थितीत शाळा बंद असल्याने या अंध विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात जाऊन कसे शिकवायचे, हे मोठे आव्हान सर्व शिक्षकांसमोर होते. मात्र ‘अंध बच्चो की पाठशाला’ या नावाने आजी व माजी विद्यार्थी या उपक्रमाद्वारे एकत्र आले, तसेच प्रत्येक विषय शिक्षकांनी आपापल्या परीने ज्ञानार्जन देण्याचे चांगले प्रयत्न केले आहे. शाळा बंदच्या कार्यकाळात वर्तमानातील ताज्या घडामोडीसह लेख वाचून दाखविणे व त्याचे रेकॉर्ड करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, घरच्या घरीच टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक वस्तू तयार करणे, कविता गायन करणे, पुस्तकातील उतारे, त्यावर नाट्य बसविणे, अशाप्रकारे विविध पद्धतीने शिक्षण दिले जात आहे.
कोट
लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना भेटता आले नाही. तरी दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी आपणाला स्वतःच्या आनंदासाठी काहीतरी करता आले, याचे समाधान अधिक आहे म्हणून या कार्यात गुंतवून घेतले आहे.
-परमानंद तिरानिक,
अंध विद्यालय आनंदवन.