दत्तात्रय दलाल
ब्रह्मपुरी : आधुनिकीकरण व ऑनलाईन व्यवहारामुळे पोलीस ठाण्यातील प्रत्येक कार्य अद्ययावत करण्यात आले. आता तक्रारीची नोंद थेट ऑनलाईन किंवा एफआयआर दाखल करण्यात येते. तपासी अधिकारी वगळता गुन्ह्याची माहिती कुणाकडेही उपलब्ध राहत नाही. त्यामुळे विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना अमुक घटनेची माहिती मिळविण्यासाठी तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा लागतो. स्टेशन डायरीवर कोणतीही माहिती उपलब्ध राहत नाही.
मागील बऱ्याच कालावधीपासून राज्यातील पोलीस ठाणे ऑनलाईन करण्यात यावे, प्रत्येक गुन्ह्याची नोंद ऑनलाईन करण्यात यावी, असा उद्देश होता. त्यापूर्वी एका छोट्या गुन्ह्यासाठी पोलिसांना अनेक कागदपत्रे हाताने भरावी लागत असत. त्यामुळे बराच वेळ वाया जात असे. या गंभीर बाबीची दखल घेऊन ऑनलाईन नोंद करण्यात आली. आता पोलीस कर्मचाऱ्यांना कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यासाठी असंख्य कागदपत्रे तयार करावी लागत नाहीत. मोजक्या कागदपत्रांद्वारे ऑनलाईन नोंद करता येते. गुन्ह्याची नोंद ऑनलाईन होत असल्याने जिल्हा पोलीस कक्षाला ही माहिती तत्काळ प्राप्त होते.
एखादी मोठी घटना घडल्यास त्या प्रकरणाचा तपास संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी कशा प्रकारे करावा, याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळते. त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास योग्य दिशेने होण्यास मदत मिळते. पोलीस कर्मचाऱ्यांचा त्रास कमी झाला असला व गुन्ह्याचा तपास करणे सोपे झाले असले तरी ऑनलाईन गुन्ह्याच्या व तक्रारीच्या नोंदीमुळे ठाण्यातील स्टेशन डायरीवर त्या गुन्ह्याचा किंवा तक्रारीचा क्रमांक टाकलेला असतो. इतर प्रकरणांच्या किंवा गुन्ह्यांच्या संपूर्ण माहितीची कागदपत्रे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडेच असतात.
बॉक्स
स्टेशन डायरीतही नोंद हवी
एखाद्या गुन्ह्याची माहिती घेण्याकरिता प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी गेले असता तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे माहिती असल्याचे डायरीवर हजर कर्मचारी सांगतात. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांची वाट पाहात राहावे लागते. गुन्हा ऑनलाईन दाखल केल्यानंतर किंवा तक्रार दाखल केल्यानंतर त्याची एक प्रत स्टेशन डायरीत ठेवावी. यामुळे प्रसार माध्यमांना वेळेवर सर्व माहिती उपलब्ध होईल, अशी मागणी जोर धरत आहे.
230921\screenshot_2021_0911_120134.png
ब्रम्हपुरी पोलीस ठाणे