दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची गरज असते. त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठ्या रांगा लागत होत्या. पूर्वी केवळ पाच प्रकारच्या अपंगत्वांनाच हे प्रमाणपत्र देण्यात येत होते. प्रमाणपत्रासाठी पूर्वीची ऑफलाईन प्रक्रिया बंद झाली आहे. आता केंद्र शासनाने डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वावलंबन डॉट जीओव्ही डॉट ईन हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर दिव्यांग संपूर्ण कागदपत्र अपलोड करुन अर्ज भरावा लागतो. त्यानंतर शल्य चिकीत्सक, सहाय्यक शल्य चिकित्सक व संबंधित विषयाचे तज्ज्ञ यांच्याकडून तपासणी करण्यात येते. त्यानंतर त्याच्या क्षमतेनुसार तात्पुरते व कायमस्वरुपी प्रमाणपत्र वितरीत करण्यात येते. प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर संबंधित उमेदवाराच्या मोबाईलमध्ये मॅसेज जातो. त्यानंतर समाजकल्याण विभागातर्फे प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येते. कोरोनामुळे प्रमाणपत्रासाठी कमी लोकांना बोलविण्यात येत आहे. परंतु, ऑनलाईन प्रक्रियेमुळे दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे सोपे झाले आहे.
बॉक्स
आठवड्यातून दोन दिवस तपासणी
दिव्यांगाने अर्ज केल्यानंतर त्याची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी बुधवार व गुरुवारी बोलविण्यात येते. यावेळी शल्य चिकित्सक, सहाय्यक शल्य चिकित्सक व संबंधित विभागाच्या तज्ज्ञांकडून त्याची तपासणी करण्यात येते. त्यानंतर त्याच्या क्षमतेनुसार त्याला दिव्यांगाचे प्रमाणपत्र देण्यात येते. ४० टक्के दिव्यांगत्व असेल तर त्याला शासनाच्या संपूर्ण शासकीय योजनांचा लाभ मिळत असतो.
बॉक्स
२१ प्रकारच्या दिव्यांगत्वाचा समावेश
पूर्वी केवळ पाच प्रकारच्या अपंगत्वांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात येते होते. मात्र, आता २१ प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश झाला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे आता अनेक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे.
बॉक्स
अपंग प्रमाणपत्र कशासाठी?
१) बस व रेल्वे प्रवास शुल्कात दिव्यांगांना सूट मिळते. यासाठी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. यासाठी अनेक दिव्यांगांना प्रमाणपत्र आवश्यक आहे.
२) शैक्षणिक सुविधेसाठी दिव्यांगांना अपंगत्व प्रमाणपत्र द्यावे लागते. या प्रमाणपत्राआधारेच दिव्यांगांना विविध शैक्षणिक सुविधा प्राप्त होतात.
३) दिव्यांगांसाठी घरकुल योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना प्रमाणपत्र सादर करावे लागते. ग्रामीण तसेच शहरी भागातही घरकुल योजनेची अंमलबजावणी होत असते.
कोट
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पद्धत सुरू झाली आहे. ज्या दिव्यांगांनी अद्यापही प्रमाणपत्र काढले नाही किंवा प्रमाणपत्र रिनिव्हल केले नाही. त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. तपासणी केल्यानंतर त्याला प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येईल.
- निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर
-