चंद्रपूर : कोरोना संकटामुळे यावर्षी विद्यार्थ्यांविना नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. सध्या ऑनलाइन अभ्यासक्रम घेतला जात आहे. मात्र सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणारे मोफत पाठ्यपुस्तक अद्यापही विद्यार्थ्यांच्या हातात पडले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांशिवाय ऑनलाइन शाळा करावी लागत आहे. त्यामुळे अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
विशेष म्हणजे, दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जात होती.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानातून दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. यासाठी शिक्षण विभाग उन्हाळ्याच्या सुट्यांच्या दिवसापासूनच नियोजन करतात. यावर्षीही बालभारतीकडे १ लाख ५७ हजार ५७८ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची नोंदणी केली आहे. मात्र कोरोना संसर्गामुळे यावर्षी पुस्तकांची छपाई बालभारतीकडून थांबली होती. परिणामी शाळा सुरू होऊन पंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांच्या हातात अजूनही पुस्तक पडले नाही. दरवर्षी नवीन पुस्तकांची विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. यावर्षी ना शाळा, ना पुस्तक अशी अवस्था विद्यार्थ्यांची झाली आहे. यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
बाॅक्स
तालुकानिहाय विद्यार्थी
चंद्रपूर २०,७७६
भद्रावती ८५७२
वरोरा १३,५४०
चिमूर १३,९९४
ब्रह्मपुरी १४,६१३
नागभीड ११,५१८
सिंदेवाही १०,३४४
मूल १०,६१०
सावली ९४३२
पोंभुर्णा ४००४
गोंडपिपरी ७७७२
बल्लारपूर ६१७७
राजुरा १०,०६२
कोरपना ९५८३
जिवती ७५८१
एकूण-१,५७,५७८
--
सहा हजार विद्यार्थ्यांनीच केली पुस्तके परत
यावर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या कोणत्याच वर्गाचा अभ्यासक्रम बदलला नाही. त्यातच मागील वर्षी शाळाही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे मागील वर्षीचे पुस्तके चांगल्या स्थितीत होते. या पुस्तकांचा पुनर्वापर होऊ शकतो यासाठी जिल्ह्यातील ६ हजार पालकांनी आपल्याकडील पुस्तके शाळांना परत केली आहेत. अन्य पालकांनीही वापरलेली पुस्तके शाळांना परत केल्यास दरवर्षी होणारा खर्च काही प्रमाणात का होईना टाळता येईल.
बाॅक्स
पुस्तक नाही, अभ्यास कसा करायचा?
दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जात होती. यावर्षी विद्यार्थ्यांविना शाळा सुरू होऊन पंंधरा दिवस लोटले तरीही विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके नाही. केवळ ऑनलाइन अभ्याक्रमावर भर दिला जात आहे. मात्र पुस्तकच नाही तर अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न सध्या विद्यार्थी उपस्थिती करीत आहे. विशेष म्हणजे, सेतू अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र काही ठिकाणी या अभ्यासक्रमापासून विद्यार्थी वंचित आहेत.
कोट
जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या लक्षात घेऊन बालभारतीकडे पुस्तकांची नोंदणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यात सध्या पुस्तके येत आहे. काही पुस्तके आली असून, अन्य विषयांचेही पुस्तक लवकरच प्राप्त होईल.
- दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प., चंद्रपूर